Home » जळगाव » शिष्यवृत्तीकरिता महाडीबीटी वर आधार नोंदणी नसलेल्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन अर्ज करता येणार !

शिष्यवृत्तीकरिता महाडीबीटी वर आधार नोंदणी नसलेल्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन अर्ज करता येणार !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीकरिता अर्ज करताना आधार नोंदणी न केल्याने महाडीबीटी प्रणालीवर अर्ज नामंजूर झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना त्यांचे आधार प्रमाणपत्र सादर करून ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयामार्फत प्रकल्प अधिकारी कार्यालयात शिष्यवृत्ती/फ्रीशीपकरिता ३१ जानेवारी पर्यंतच्या मुदतीत ऑफलाईन अर्ज सादर करावयाचे आहेत.

तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केला होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे महाडीबीटी प्रणालीवर महाडीबीटी एडमीन कडून अर्ज नामंजूर झाले आहेत. अशा विद्यार्थ्यांना देखील ऑफलाईन अर्ज सादर करता येणार आहे. मात्र त्यांना कोणत्या कारणांमुळे ऑनलाईन अर्ज रिजेक्ट झाला त्याची कारणमीमांसा व त्याबाबतच्या पूर्ततेसह ऑफलाईन अर्ज सादर करणे आवश्यक असणार आहे.

ऑनलाईन अर्ज सादर करताना महाडीबीटीवरील नामंजूर झालेल्या अर्जांचा क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. सदर अर्ज क्रमांक नमूद नसेल अशा अर्जांचा शिष्यवृत्तीकरिता विचार करण्यात नाही.

ज्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या उत्पन्न मर्यादा, जात पडताळणी प्रमाणपत्र इत्यादी निकषांमध्ये बसत नसल्यामुळे महाविद्यालय स्तरावरुन अथवा प्रकल्प अधिकारी स्तरावरुन नामंजूर झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना ऑफलाईन अर्ज सादर करता येणार नाहीत.

जे विद्यार्थी काही विशिष्ट कारणांमुळे महाडीबीटी प्रणालीवर अर्ज भरु शकले नाहीत अथवा अर्जाची नोंदणी करुनही ज्यांचे अर्ज मंजूर होऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना कारणमीमांसासह ऑफलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. तथापि, या प्रकरणी विद्यार्थ्यांनी नमूद केलेली कारणमीमांसा समर्पक असल्यास शिष्यवृत्ती देय ठरणार आहे व याबाबतचा अंतिम निर्णय शासनाचा असणार आहे. ऑफलाईन अर्ज सादर करताना महाडीबीटी प्रणालीवर लागू असलेले सर्व निकष संबंधित विद्यार्थ्यांना लागू राहतील त्याचप्रमाणे आवश्यक ती सर्व कागदपत्रे नोंदविणे आवश्यक असणार आहे. (उदा. उत्पन्न मर्यादा, जात पडताळणी प्रमाण, कॅप राऊंड प्रमाणपत्र इ.).

ज्या अभ्यासक्रमाचे मॅपिंग त्या त्या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती / फ्रीशीपसाठी महाडीबीटी प्रणालीवर करण्यात आले आहेत. असेच अभ्यासक्रम शिष्यवृत्ती / फ्रीशीपचे ऑफलाईन अर्जाकरिता लागू राहतील. महाडीबीटी प्रणालीवर त्या त्या शैक्षणिक वर्षांत मॅपिंग न झालेल्या अभ्यासक्रमाची शिष्यवृत्ती / फ्रीशीपच्या ऑफलाईन पध्दतीने सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

तसेच एकाच विद्यार्थ्यांचे ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सादर होणार नाहीत याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. याप्रकरणी ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःचे प्रतिज्ञापत्र संबंधित विद्यार्थ्यांने द्यावे. या प्रकरणी दोन्ही प्रकारात विद्यार्थ्यांने अर्ज सादर केलेला असल्याची बाब निष्पण्ण झाल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

सन २०१८-१९ ते २०२३-२४ या वर्षात ज्या विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर नोंदणीकृत अर्जांची मंजूरी करण्यास अडचणी आल्या आहेत. अशा विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज सादर करायचे आहेत. शिष्यवृत्ती देण्यामागे केवळ होतकरु व गुणवंत विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये असा मुख्य उद्देश असल्यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामार्फत प्रकल्प अधिकारी कार्यालयास शिष्यवृत्ती / फ्रीशीप करिता ऑफलाईन अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक ३१ जानेवारी २०२५ असेल.

दिनांक ३१ जानेवारी २०२५ नंतर येणाऱ्या कोणत्याही अर्जांना शासनाकडून मंजूरी देण्यात येणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी व अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल जि. जळगांव यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!