मुंबई ( वास्तव पोस्ट ) : विधानसभा निकाल लागून मोठा कालावधी लोटला असला तरी महायुतीमधील नाराजी नाट्य मात्र काही थांबायचे नाव घेत नाहीये. नाशिकमध्ये भाजपचे नेते गिरिश महाजन यांना पालकमंत्रीपद दिल्याने महायुतीत नाराजीनाट्य पाहायला मिळालं तर रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत पालकमंत्री पदावरून वादाला सुरुवात झाली आहे. याच मुळे आता राज्य सरकारने या दोन्हीही जिल्ह्यांतील पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्याच आठवड्यात शनिवारी दि.१८ रोजी राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली होती. यात नाशिक आणि रायगड या ठिकाणच्या पालकमंत्री पदावरुन वादाची ठिणगी पडली. रायगड पालकमंत्री पदी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांची वर्णी लागल्याने शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले नाराज झाले. तर नाशिकमध्ये दादा भुसे यांच्या ऐवजी गिरीश महाजन यांची निवड करण्यावरून भाजप आणि शिवसेनेत मतभेद झाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध आणि निदर्शने झाल्यामुळे राज्य सरकारने नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.
महायुतीमध्ये खातेवाटप जाहीर झाल्यानंतरही पालकमंत्रीपदाचा निर्णय बराच काळ रखडला होता. तब्बल दिड महिन्या नंतर शनिवार १८ जानेवारी रोजी रात्री उशिरापर्यंत पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली. यावेळी पालकमंत्रीपदाचे वाटप करताना अनेक दिग्गज नेत्यांना डावलण्यात आल्याने नेते आणि कार्यकर्ते यांच्यात नाराजी उफाळून आली आहे.
भरत गोगावलेंना रायगडचे पालकमंत्रीपद न मिळाल्याने शिवसैनिक आक्रमक झाले. जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपले सामूहिक राजीनामे देत निषेध व्यक्त केला. तिकडे नाशिकमध्ये दादा भुसे यांना डावलून त्यांच्यावर अन्याय केल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान पालकमंत्री पदावरुन डावलल्यानंतर दादा भुसे यांनी माध्यामांना आपली प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, जी जबाबदारी दिली ती पुढे नेणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे काम असते. मला या ठिकाणी जी काही जबाबदारी दिली आहे, ती आम्ही पुढे नेऊ. श्रेष्ठींनी जे निर्णय घेतले ते पुढे नेणे ही आमची जबाबदारी आहे, असेही दादा भूसे म्हटले होते.