मुंबई दि . ०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला हरवलं. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकुन गोलंदाजी स्वीकारली. पकिस्तानच्या डावात अझान अवैस आणि अराफत मिन्हास या जोडीने संघाला १८० धावापर्यंत पोहोचवण्यास मदत केली. अझान आणि अराफतने प्रत्येकी ५२ धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही खेळाडू तग धरू शकला नाही. पाकिस्तानचा डाव ४८.५ षटकात १७९ धावांत संपुष्टात आला . १८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतांना ऑस्ट्रेलियाचे ४ गडी झटपट बाद झाले. त्यामुळे दडपण आलं होतं. पण हॅरी डिक्सन आणि ओलिवर पीक यांनी डाव सावरला. मोक्याच्या क्षणी हॅरी डिक्सन ५० धावा करून बाद झाल्याने दडपण वाढलं. तो मिन्हासच्या गोलंदाजीवर क्लिन बोल्ड झाला. विजयासाठी १८० धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाने १ गडी राखून शेवटच्या षटकात पूर्ण केलं.
आता अंतिम फेरीत भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. ११ फेब्रुवारीला अंतिम फेरीचा सामना होणार आहे. भारताने नवव्यांदा, तर ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे.
