कजगाव ( वास्तव पोस्ट ) : भडगाव तालुक्यातील मोठे गाव तसेच बाजारपेठेचे गाव म्हणून कजगाव प्रसिद्ध आहे. गावाचा विस्तार हा दिवसेंदिवस वाढत आहे, त्यातच घर बांधकामांनाही गती मिळाली आहे. पण घर बांधकाम करताना कुठल्याही प्रकारचे नियम पाळले जात नसून उलट जास्तीत जास्त अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम करण्याकडे नवीन घर बांधकाम करणाऱ्या नागरिकांचा कल दिसत आहे.
या गावातील जुने गाव परिसरात तर भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जुन्या गावात काही वर्षांपूर्वी मोठे ट्रक सहज ये जा करू शकत होते, त्यामुळे शेतकरी यांचा शेतीमाल नेण्यास सुलभता होती. परंतु नवीन बांधकाम करणाऱ्या व्यक्तींकडून अतिक्रमण केल्यामुळे आता मोटरसायकल चालविणे सुद्धा अवघड झाले आहे. तसेच परिसरातील गटारी अतिक्रमणामुळे जणू गायबच झाले आहेत.
अतिक्रमण धारकांनी या गटारीवर तसेच गटारीच्या पुढे बांधकाम केल्यामुळे गटारी साफ करण्यास अडचण निर्माण होत आहे. यामुळे गटारी जाम होऊन परिसरात दुर्गंधी पसरलेलीे आहे. या गटारींमध्ये डास मच्छरांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. कुणी याबाबत बोलले तर अतिक्रमण करणाऱ्या व काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून मारहाण व शिवीगाळ करण्याचे प्रकार होत असतात. तरी स्थानिक ग्रामपंचायतीने तसेच संबंधित प्रशासनाने या बांधकामाची चौकशी करून अतिक्रमण काढून गटारी व रस्ते मोकळे करावे, अशी मागणी जुने गाव परिसरातील रहिवासी करीत आहेत. ग्रामपंचायतने सदर अतिक्रमण न हटवल्यास नागरिकांकडून आंदोलन करण्याच्या मार्गावर असल्याचे समजते.
