Home » जळगाव » बांधकाम तसेच भोगवटा प्रमाणपत्रासाठी लाच स्विकारतांना नगर रचना सहाय्यकास रंगेहात अटक

बांधकाम तसेच भोगवटा प्रमाणपत्रासाठी लाच स्विकारतांना नगर रचना सहाय्यकास रंगेहात अटक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महानगरपालिकेच्या नगर रचना विभागात कार्यरत असलेल्या नगर रचना सहाय्यक वर्ग ३ यास लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. आज दि.९ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या या कारवाईत मनोज समाधान वन्नेरे (वय ३४) यास आज अटक करण्यात आली. या घटनेमुळे जळगाव शहरात तसेच अधिकारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराने बांधकाम परवानगी आणि बांधकाम झालेल्या घराचे भोगवटा प्रमाणपत्रासाठी नगर रचना विभाग मनपा जळगाव येथे एकूण तीन प्रकरणात अर्ज केले असता संबंधित सहाय्यकाने या कामाच्या मंजूरीसाठी तक्रारदाराकडून पहिल्या आणि दुसऱ्या प्रकरणासाठी प्रत्येकी १५हजार असे एकूण ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

पहिल्या प्रकरणासाठी २१ हजार रुपये मागण्यात आले. मात्र तडजोडीनंतर १५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. दरम्यान आज दुपारी ३ वाजता लाचलुचपत विभागाने सदर नगर रचना सहाय्यकास सापळा रचून पहिल्या प्रकरणासाठी ही १५ हजार रुपयांची रक्कम स्विकारतांना रंगेहात अटक केली.

पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोलीस नाईक किशोर महाजन, राकेश दुसाने यांचा सहभाग होता. लाचलुचपत विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!