Home » महाराष्ट्र » ‘आचार्य बाळ शास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजने’च्या मासिक सन्मान निधीत वाढ होणार

‘आचार्य बाळ शास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजने’च्या मासिक सन्मान निधीत वाढ होणार

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजने’ अंतर्गत ज्येष्ठ पत्रकारांचे मासिक मानधन २०,००० रुपये करण्याची घोषणा केली. यासोबतच या योजनेचे नियम शिथिल करण्याबाबतही निर्णय घेण्यात येणार आहे. मंत्रालयातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच मंत्रालयातील पत्रकार कक्षात पोहोचले, तेथे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी त्यांचे स्वागत केले.

दरम्यान माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ मे २०२३ रोजी सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात हा निधी वाढविण्याची घोषणा केली होती, मात्र अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. डोईफोडे यांची ही मागणी गांभीर्याने घेत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सरकार या प्रश्नासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. येत्या काही आठवड्यात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकृत सरकारी आदेश (जीआर) जारी केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

मार्च २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हा निधी वाढवण्याची योजना आखण्यात आली होती, मात्र तांत्रिक कारणांमुळे हा निर्णय प्रलंबित राहिला. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

यावेळी मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघटनेचे सरचिटणीस प्रवीण पुरो, कोषाध्यक्ष विनोद यादव, कार्यकारिणी सदस्य खंडुराज गायकवाड, भगवान परब, आलोक देशपांडे, मनोज मोघे आदींसह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!