Home » महाराष्ट्र » महायुतीची आज मुंबईत होणारी बैठक अचानक रद्द ! एकनाथ शिंदे आपले मूळगाव दरे गावी रवाना !

महायुतीची आज मुंबईत होणारी बैठक अचानक रद्द ! एकनाथ शिंदे आपले मूळगाव दरे गावी रवाना !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्रातील मुख्यमंतत्रीपद तसेच सत्तास्थापन संदर्भात काल रात्री दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत अमित शाह यांनी अनेक सूचना दिल्या.

कालच्या बैठकीनंतर आज मुंबईत महायुतीची पुन्हा बैठक होणार होती. मात्र अचानकपणे महायुतीची ही बैठक रद्द करण्यात आली आहे. यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे हे आपल्या मूळगावी निघुन गेल्याचे कळते. आज होणारी ही बैठक पुढे ढकलण्यात आली असून, दिल्ली येथील बैठकीतून मुख्यमंत्री पदाचा तिढा मात्र सुटलेला नाही.

कालच्या बैठकीतल्या छायाचित्रांमध्ये एकनाथ शिंदे यांची देहबोली बघता त्यांच्या मनाची द्विधा अवस्था तसेच नाराजी दिसून येत आहे. याचे नेमके कारण म्हणजे मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतर उपमुख्यमंत्रिपद घेणे हे असु शकते. शिंदेंनी आधीच भाजपश्रेष्ठींचा जो निर्णय असेल, तो मान्य करत सीएम पदाच्या शर्यतीतून अप्रत्यक्ष माघार घेतली आहे. मात्र शिवसेनेतील नेत्यांनी शिंदेंकडे उपमुख्यमंत्रिपद तरी स्वीकारण्याचा तगादा लावला आहे.

दरम्यान मुख्यमंत्रीपद सोडतानाच एकनाथ शिंदे यांनी गृह, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम यासारख्या भारदस्त खात्यांची मागणी केली आहे. यापैकी गृह खाते देवेंद्र फडणवीस सोडण्याची शक्यता कमीच आहे. तर अर्थ मंत्रालयावरही अजितदादांनी आपला दावा उघड सांगितला आहे. त्यामुळे शिंदेंना नगरविकास, पीडब्ल्यूडीवर समाधान मानावे लागू शकते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीत एकजूटता असल्याचा मेसेज देण्यासाठी भाजपला राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची वर्णी लावायची आहे. मात्र शिंदे हे उपमुख्यमंत्री पदास इच्छुक नसल्याचे कळते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!