Home » शैक्षणिक » ओरियन स्कूल मध्ये नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन ; विद्यार्थ्यांकडून विविध उपक्रमाचे सादरीकरण

ओरियन स्कूल मध्ये नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन ; विद्यार्थ्यांकडून विविध उपक्रमाचे सादरीकरण

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने त्यांच्यातील कल्पकतेला वाव देण्यासाठी आणि त्यांच्या मनातील संकल्पना प्रायोगिक पद्धतीने करून पाहण्यासाठी ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विंडोज टू विस्डम, अ जर्नी थ्रू सब्जेक्ट चे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी फ्लावर रंगोली, संगीत मैफिल, आर्ट गॅलरी या कार्यक्रमांचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे शशीकांत वडोदकर, प्राचार्य डॉ. अशोक राणे के.सी.ई. सोसायटी बीएड कॉलेज, युवराज राणे आणि प्रिन्सिपल श्रीधर सूनकरी स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम स्कूल तसेच पालक शिक्षक संघाचे जॉईन सेक्रेटरी किरण बोंडे आदी उपस्थित होते. स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत सर्वांचे केले.

फ्लावर डेकोरेशन कॉम्पिटिशन मुळे शाळेचा संपूर्ण परिसर विविध सुगंधित फुलांनी सुशोभित होता. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध नक्षीदार रांगोळ्या साकारलेल्या होत्या. त्याचबरोबर संगीत मैफिल या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेख अशी नवीन ,जुनी भक्तीमय गाणी सादर केली ज्यामुळे पालक मंत्रमुग्ध होऊन गेले. कमी वेळामध्ये विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाच्या सादरीकरणाची तयारी केलेली होती.

आर्ट गॅलरीमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे स्केच बनवलेले होते. तसेच टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू देखील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात ठेवल्या होत्या. मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, विज्ञान, गणित आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी वर्किंग मॉडेल्स सादर केले. रोबोट आपल्या कार्यक्षमतेनुसार विविध कामे करून दाखवत होता. निवडणुकीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी वोटिंग मशीन बनवलेले होते ज्यामध्ये विद्यार्थी पालकांमध्ये मतदानाबद्दलची जागरूकता निर्माण करीत होते.

सोलर एनर्जीच्या माध्यमातून आपण नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर कमीत कमी रित्या कशा प्रकारे करू शकतो हे विद्यार्थी पालकांना पटवून देत होते. अशाप्रकारे नर्सरी ते इयत्ता दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होऊन आपले कलागुण सादर केले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उप प्राचार्या मेघना राजकोटिया आणि भारती खडके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!