मुंबई ( वास्तव पोस्ट ) : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित होतील. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबद्दलची मोठी घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्रात आचारसंहिताही लागू झाली आहे.
महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपणार आहे. सणासुदीच्या काळात निवडणुकांची घोषणा केली जात नाही. यंदा दिवाळी दि.२९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. विशेष म्हणजे यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत.
◆ महाराष्ट्र विधानसभा निवडणुक कार्यक्रम
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत संपूर्ण राज्यात एकाच दिवशी मतदान प्रक्रिया होणार आहे. महाराष्ट्रात दि.२० नोव्हेंबरला मतदान होऊन दि.२३ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाईल, अशी महत्वाची माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली.
विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख ही २२ ऑक्टोबरपासून सुरु होईल. उमेदवार २९ ऑक्टोबरपर्यंत आपला अर्ज दाखल करु शकणार आहेत. यानंतर ३० ऑक्टोबरला सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल. तर ४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत उमेदवारी मागे घेऊ शकणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली आहे.२५ नोव्हेंबरपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होणार आहे.
महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे लढले होते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचीही युती होती. पण यंदा हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. २०१९ मध्ये झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजप १०५ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेने ५६ जागांवर विजय मिळवला होता. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस ५४ जागांसह तिसऱ्या आणि काँग्रेस ४४ आमदारांसह चौथ्या स्थानावर होती.
