सोलापुर ( वास्तव पोस्ट ) : महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ महामेळाव्याला सोलापूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला. यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून रेकॉर्डब्रेक कालावधीत २ कोटी २० लाख बहिणींच्या खात्यामध्ये राज्य सरकारने रक्कम जमा केली आहे. दिवाळीची भाऊबीज म्हणून नोव्हेंबरची रक्कम ऑक्टोबर महिन्यामध्येच बहिणींच्या खात्यात जमा होत आहे. लाडक्या बहिणींची सेवा करण्याची शक्ती सातत्याने आम्हाला मिळो, असे साकडे यावेळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंगाकडे घातल्याचे ते म्हणाले.

◆ विविध विकासकामांचे झालेले भूमिपूजन आणि शुभारंभ
- भीमा-उजनी प्रकल्पांतर्गत देगाव शाखा कालवा आणि बोरी मध्य प्रकल्पामध्ये एकरुख उपसा सिंचन योजनेच्या कामाचा शुभारंभ.
- रु.३३६६ कोटी रुपये शासकीय अनुदानातून २४२ शासकीय व सकरी उपसा जल सिंचन योजनांच्या (905 MW ) सौर उर्जीकरण प्रकल्पांचे भूमिपूजन.
- पायाभूत विद्युत सुविधांच्या रु. २७७३ कोटींच्या सक्षमीकरण व विस्तारीकरण कामांचा शुभारंभ.
टेंभू, सांगोला, मंगळवेढ्यामध्ये सुरु असलेल्या योजना या दुष्काळी भागाचा शिक्का पुसण्याचे काम करतील. वेगवेगळ्या महामार्गांचे जाळे, सोलापूर शहरातले पिण्याचे पाणी, भुयारी गटार अशा अनेक योजना राज्य सरकारकडून राबवल्या जात असून सोलापूरच्या सर्वांगीण विकासाचे काम सुरु आहे. यावेळी आई तुळजाभवानीच्या चरणी छत्रपती शिवाजी महाराजांसारखेच रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी आशीर्वाद मागितले.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार सुभाष देशमुख, आमदार संजय शिंदे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार राम सातपुते, आमदार शहाजीबापू पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
