ठाणे (वास्तव पोस्ट ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) मध्ये ३३ हजार कोटींहून अधिक किंमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी, लोकार्पण करण्यात आले. महाराष्ट्रातील पहिली भूमिगत मेट्रो-कुलाबा-वांद्रे-सीप्झ टप्पा-१ (आरे जेव्हीएलआर ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स स्थानक) शुभारंभ, ठाणे शहरांतर्गत वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी तसेच छेडा नगर ते आनंद नगर पूर्व मुक्त मार्ग विस्तार, नैना नगर रचना परियोजनांतर्गत पायाभूत सुविधा कामे आणि ठाणे महानगरपालिकेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजानिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, सुरेश म्हात्रे, सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.
