Vijay Kadam Passes Away : मराठी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते विजय कदम यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले. विजय कदम गेल्या काही काळापासून कॅन्सरशी लढा देत होते. अखेर आज दि.१० रोजी विजय कदम यांची प्राणज्योत मालवली. यामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टी गाजवणारे दिग्गज अभिनेता विजय कदम यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी दुःखद निधन झाले. मराठी चित्रपटसृष्टीला हा मोठा धक्का असून मागील दीड वर्षापासून कॅन्सरने विजय कदम हे आजारी होते. आज सकाळी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
विजय कदम यांच्या पार्थिवावर आज अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. एक हरहुन्नरी आणि विनोदी अभिनेता हरपल्याने मराठी चित्रपटसृष्टीत एक पोकळी निर्माण झाली असल्याची हळहळ सर्वांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
विजय कदम हे ६७ वर्षांचे असून त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते. अखेर त्यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी त्यांच्या राहत्या घरीच अखेरचा श्वास घेतला.
विजय कदम यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात नाटकांपासून केली होती. यानंतर विजय कदम यांनी काही मराठी सिनेमांमध्ये काम केले. एवढेच नव्हे टीव्ही मालिकांमधूनही विजय कदम यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. विजय कदम यांचे ‘विच्छा माझी पुरी करा’ नाटक रंगभूमीवर गाजले होते.
