CM EKNATH SHINDE : पुस्तकाच्या अनावरणावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, खरं तर हे पुस्तक म्हणजे माझ्या आयुष्याचा संपूर्ण पिक्चर नाही, इंटर्व्हल देखील नाही. हा तर फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अभि बाकी है,असे सांगून सदैव कार्यरत राहीन अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी याप्रसंगी दिली.
मुंबई ( वास्तव पोस्ट ) : ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित, त्यांच्या राजकीय वाटचालाची माहिती देणाऱ्या ‘योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’ या डॉ. प्रदीप ढवळे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे अनावरण झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मुख्यमंत्री शिंदे यांचे कुटूंबातील सदस्य आवर्जून उपस्थित होते.

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, खरं तर माझ्या आयुष्यावर पुस्तक लिहावे असे काम मी अद्याप केलेले नाही. त्यामुळेच गेली दोन वर्षे या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचे मी टाळत होतो. मी केलेल्या कष्टांचे, संघर्षाचे उदात्तीकरण व्हावे हे मला अजिबात मान्य नव्हते, मात्र अखेरीस ज्यांनी हे पुस्तक तयार करण्यासाठी मेहनत घेतली त्यांच्या आग्रहामुळे मी त्यासाठी होकार दिल्याचे प्रांजळपणे कबूल केले.

खरं तर हे पुस्तक म्हणजे माझ्या आयुष्याचा संपूर्ण पिक्चर नाही, इंटर्व्हल देखील नाही. हा तर फक्त ट्रेलर आहे.पिक्चर अभि बाकी है,असे सांगून आजपर्यंत केले तसेच यापुढेही अधिक जबाबदारीने सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी सदैव कार्यरत राहीन अशी ग्वाही याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
आयुष्यात मी शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री हा जो प्रवास केला त्याचे श्रेय माझ्या एकट्याचे नसून संपूर्ण सहकाऱ्यांचे आहे असे सांगितले. मला काय मिळाले यापेक्षा मी समाजाला काय देऊ शकतो याचा विचार करून कार्यरत राहिलो. आज मुख्यमंत्री असलो तरी सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळेल यासाठी मी कायम कटिबद्ध आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण अंगिकारून काम करतो आहे. खर तर कर्मयोगी ऐवजी मला कार्यकर्ता म्हंटले असते तर मला जास्त आवडले असते.
यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, पद्मश्री शंकरबाबा पापळकर, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री दादाजी भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, मा.आमदार रवींद्र फाटक, आमदार निरंजन डावखरे, शिवसेना सचिव संजय मोरे, ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे, प्रा.डॉ. प्रदीप ढवळ आणि डॉ. अरुंधती भालेराव, राष्ट्रवादी ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, प्रमोद हिंदुराव, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर तसेच ठाणे शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
