Headlines
Home » आंतरराष्ट्रीय » प्रचंड हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांचा राजीनामा ; दिल्लीमार्गे लंडनला जाणार !

प्रचंड हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांचा राजीनामा ; दिल्लीमार्गे लंडनला जाणार !

Bangladesh Violence : बांग्लादेशच्या पंतप्रधान निवास स्थानावर जमावाने हल्ला केला आहे. तर हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून त्या दिल्लीहून लंडनला जाण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, बांगलादेश लष्कराने कमांड हाती घेतली असून अंतरिम सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू आहे, असे लष्करप्रमुख वकार-उझ-जमान यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भीषण हिंसाचाराच्या दरम्यान आपल्या पदाचा राजीनामा देऊन देश सोडला. बांगलादेशला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर उसळलेल्या सर्वात मोठ्या हिंसाचारामुळे काल रविवारपासून १०६ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

बांगलादेशच्या लष्करप्रमुखांचे वक्तव्य :

बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकेर उझ झमान यांनी एका टीव्ही चॅनलला केलेल्या भाषणात सांगितले की, आता लष्कराने देशाचा ताबा घेतला असून अंतरिम सरकार स्थापन केले जाईल. पंतप्रधान हसिना यांनी देश सोडल्याची पुष्टी त्यांनी केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार हसिना आपल्या बहिणीसोबत लष्करी हेलिकॉप्टरने रवाना झाल्या असून त्या भारताच्या पश्चिम बंगाल किंवा ईशान्येच्या त्रिपुरात उतरल्या असण्याची शक्यता आहे.

आनंदोत्सवाबरोबरच तोडफोडीचे दृश्ये :

टेलिव्हिजनवर दाखवण्यात आलेल्या दृश्यांमध्ये हजारो लोक राजधानी ढाक्याच्या रस्त्यावर उतरत, उत्सव साजरा करताना आणि घोषणा देत असल्याचे दिसून आले.

तर अनेकांनी शेख हसीना यांच्या अधिकृत निवासस्थानावर हल्ला करत विजयाची चिन्हे दाखवली. काही लोकांनी देशाच्या सर्वात सुरक्षित मानल्या गेलेल्या या इमारतीमधून टीव्ही संच, खुर्च्या आणि टेबल बाहेर नेले. ढाक्यातील आंदोलकांनी हसीना यांचे वडील स्वातंत्र्यनेते शेख मुजीबुर रहमान यांच्या मोठ्या पुतळ्यावर चढून पुतळ्याची विटंबना केली.

दरम्यान, बांग्लादेशच्या पंतप्रधान हसीना यांचा सरकारी नोकऱ्यांमध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांना सरकारी नोकरीत ३० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय होता. याच निर्णयाविरोधात हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. यावर गुणवत्तेच्या आधारे नोकऱ्या दिल्या जात नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. या निर्णयाला तीव्रतेने विरोध होत असतांना सर्वोच्च न्यायालयाने सरकारी नोकरीतील आरक्षणाचा कोटा ५ टक्क्यांवर आणला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ५ टक्क्यांमधील ३ टक्के कोटा स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांना देण्यात आला. यामुळे आरक्षणाविरोधात सुरू झालेल्या आंदोलनात शेख हसीनांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आणि आंदोलनाला हिंसक वळण लागले.

हसिना यांचा राजीनामा, राजकीय अस्थिरता !

प्रचंड अशा गदारोळात पंतप्रधान हसिना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या घडामोडींमुळे मात्र देशाच्या राजकीय स्थैर्याबद्दल आणि भविष्यातील प्रशासनाबाबत चिंता निर्माण झाली आहे. हसीना यांच्या देश सोडून जाण्यामुळे देशात आणखी अस्थिरता वाढू शकते. बांगलादेशाचे भविष्य सध्यातरी अधांतरी आहे. बांगलादेश आणि तेथील लोकांसाठी पुढील भविष्य निश्चित करण्यासाठी पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण असतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!