Home » जळगाव » कान्ह ललित कला केंद्रातर्फे ३ रोजी ‘वाघमार्‍या जानकीराम’ नाट्य प्रयोग ; अस्सल अहीराणी भाषेत

कान्ह ललित कला केंद्रातर्फे ३ रोजी ‘वाघमार्‍या जानकीराम’ नाट्य प्रयोग ; अस्सल अहीराणी भाषेत

जळगाव (वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित कान्ह ललित कला केंद्रातर्फे पहिल्यांदाच मनोज पाटील लिखित आणि हास्यजत्रा फेम हेमंत पाटील दिग्दर्शित ‘वाघमार्‍या जानकीराम’ या नाटकाच्या निमित्ताने व्यावसायिक निर्मितीत पाऊल ठेवण्यात येत आहे. पुण्यात स्थायिक असलेल्या खास खान्देशातील रसिक प्रेक्षकांसाठी ३ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात या नाटकाचा पहिला प्रयोग सादर होणार आहे.

या नाट्यकृतीचे निर्मिती प्रमुख खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे आहेत. या नाटकाची भाषा अस्सल अहिराणी असल्याने पुणे येथे पहिल्यांदा या नाटकाच्या अनुषंगाने आपल्या अहिराणी भाषेचा डंका वाजणार आहे. कान्ह ललित कला केंद्राचे संचालक शशिकांत वडोदकर यांनी हे धाडसी पाऊल उचलले.

बर्‍याच वर्षांपासून या केंद्रात नाट्य विभाग असून या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात नेहमीच अग्रेसर असते. त्याचप्रमाणे अहिराणी भाषेला एक विशेष दर्जा मिळायला हवा, त्याचप्रमाणे ही भाषा पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन तेथील रसिक प्रेक्षकांना अजून वेगळ्या पद्धतीने कळावी, तिचा साहित्यिक-सांस्कृतिक गोडवा कळवा, हा शुद्ध हेतू कान्ह ललित कला केंद्राचा आहे, असे समन्वयक प्रा. प्रसाद देसाई यांनी सांगितले.

दरम्यान, या नाटकात हास्यजत्रा फेम खान्देश रत्न प्रा.हेमंत पाटील हे दिग्दर्शनासह, रंगमंचावर आपल्या शैलीत अभिनय साकारतील. त्यांना या नाटकात वैभव मावळे, दिनेश माळी यांची मोलाची साथ लाभत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!