जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशन द्वारा रविवार, दि. २८ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपासून मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् योग विभागात जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुला-मुलींचे सहा गट आणि योगासनांच्या चार प्रकारांत होणाऱ्या या स्पर्धेतून राज्यपातळीवर जाण्याची संधीही स्पर्धकांना मिळणार आहे.
स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी आवश्यक असून, त्यासाठी २६ जुलै पर्यंत मुदत देण्यात आल्याची माहिती जळगाव जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशनचे सचिव प्रा. पंकज खाजबागे यांनी दिली.
या स्पर्धेत सब ज्युनिअर (१० ते १४), ज्युनिअर (१४ ते १८), सिनिअर (१८ ते २८), २८ ते ३५ वयासाठी सिनिअर (अ), ३५ ते ४५ वयासाठी सिनिअर (ब), ४५ ते ५५ वयासाठी सिनिअर (क) अशा सहा गटात विभागणी करण्यात आली आहे. त्यासाठी ३१ मार्च २०२४ पर्यंतचे वय गृहीत धरले जाणार आहे. पारंपरिक एकल, कलात्मक एकल व दुहेरी तसेच तोलात्मक दुहेरी या योगासनांच्या चार प्रकारांत ही स्पर्धा होईल. स्पर्धकांना एकापेक्षा अधिक स्पर्धा प्रकारांत सहभागी होता येईल.
सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी २६ जुलै पूर्वी ऑनलाईन नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. विजयी खेळाडूंचा संघ राज्यपातळीवर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. तर, राज्य पातळीवरील स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्यांना राष्ट्रीय स्पर्धेत स्थान मिळविण्याची संधी या स्पर्धेमुळे मिळणार आहे. दि. २६ जुलै नंतर नोंदणी करता येणार नाही आणि वेळेवर स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही याची नोंद घ्यावी. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी प्रा. पंकज खाजबागे व डॉ. देवानंद सोनार यांचेशी ८०८०१०४३१७/९१३०९३१५०५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
