Vasant more to join uddhav thackeray shivsena : वंचितची साथ सोडून वसंत मोरे ९ जुलै रोजी ते आपल्या समर्थकांसह मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनसे सोडून २ महिन्यां पूर्वी ते वंचित मध्ये गेले होते.
मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून तिकीट मिळवणारे वसंत मोरे आता वंचितची साथ सोडणार असल्याचे समोर आले आहे. वसंत मोरे मनसे, वंचितनंतर आता उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. ९जुलै रोजी त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्तही ठरला आहे. याची माहिती वसंत मोरे यांनीच दिली आहे.
लोकसभा निवडणूक ठाकरेंच्या शिवसेनेकडून लढवण्याची वसंत मोरे यांनी तयारी केली होती. यासाठी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांची भेट घेतली होती. मात्र महाविकास आघाडीत पुण्याची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने वसंत मोरे यांना उमेदवारी मिळू शकली नव्हती. त्यामुळे अखेरच्या क्षणी त्यांनी वंचितमध्ये प्रवेश करत वंचितच्या तिकीटावर लोकसभा लढवली होती.
मात्र लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. वसंत मोरे यांना खडकवासला किंवा हडपसर मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरेंचे एकेकाळचे निष्ठावान म्हणून ओळखले जाणारे वसंत मोरे यांनी मनसेची साथ सोडत वंचितमध्ये प्रवेश केला होता. मात्र २ महिन्यातच वसंत मोरे आतावंचितला सोडचिट्टी देत आहेत.
वसंत मोरे म्हणाले की, विधानसभा निवडणूक लढण्यासंबंधीचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील.
वंचित सोडण्याच्या कारणावर बोलताना वसंत मोरे म्हणाले की, मी वंचितमध्ये गेलो होतो. मला मतदारांनी स्विकारलं नाही, याबाबत मी प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोललो आहे. पुण्यात मतांचा टक्का हवा तितका नव्हता. त्यामुळे मी ठाकरे गटात प्रवेश करत आहे.
