Headlines
Home » जळगाव » सत्यशोधक समाज संघातर्फे माध्यमिक शालांत परिक्षेतील गुणवंतांचा सत्कार

सत्यशोधक समाज संघातर्फे माध्यमिक शालांत परिक्षेतील गुणवंतांचा सत्कार

Congratulations to successful students : “विविध समाजाचे होणारे जातीनिहाय खर्चिक गुणगौरव सोहळयांपेक्षा गुणवत्ता निहाय केलेले जात, धर्म, पंथविहीन अनौपचारिक सत्कार जास्त श्रेष्ठ ” असे भावोद्गार निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर यांनी यावेळी काढले.

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : सत्यशोधक समाज संघातर्फे सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील माध्यमिक शालांत परिक्षेत उत्तुंग यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी अचनाकपणे जाऊन गुणवंत सुकन्यांचे कौटुंबिक वातावरणात सत्कार सत्यशोधक समाज संघ जळगाव यांच्यातर्फे करण्यात आला.

भवरलाल अँन्ड कांताबाई जैन फाउंडेशन संचलित अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थिनी अश्विनी समाधान हरसोडे हिने ९३.८० टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल अश्विनीचा सत्कार सिद्धार्थ नेतकर (निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी) यांच्या हस्ते शाल तसेच प्रेरणादायी पुस्तके देऊन करण्यात आले.

दरम्यान, अश्विनीच्या यशाने माझ्या मनाचा देव्हाराच लख्ख उजळला नव्हे तर सात पिढयाही दिव्य यशाच्या प्रसिद्धी प्रकाशाने न्हाऊन निघाल्या’ असे आनंदोद्गार अश्विनीच्या दृष्टीहिन तथा डोळस व संवेदनशील वडील समाधान हरसोडे यांनी काढले. अश्विनीचे वडील समाधान हरसोडे व आई उषा हरसोडे हे दाम्पत्य रेल्वेमध्ये खेळणी विकून व दारोदार कटलरीचे साहित्य विकून कुटुंबाचा प्रपंच चालवतात. अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीत अश्विनीने नेत्रदिपक यश मिळवले असून तिला पेंटिंगची विशेष आवड आहे. गुणतालिकेत सर्वोच्च गुण मराठीत ९४ टक्के तर आवडीच्या गणित विषयात ९२ टक्के गुण प्राप्त केले आहेत.

यावेळी सत्कार संयोजक विजय लुल्हे यांना अश्विनीने स्वतः रेखाटलेले निसर्गचित्रे व स्टिल लाईफ दाखविले. दीनदलितांचे दैवत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘शिका व संघर्ष करा’ या जीवन मंत्रानुसार दिवस रात्र अभ्यास करुन आमच्या खानदानाचे अश्विनीने पंचक्रोशित नाव मोठे केले,’ अशा शब्दात कौतुक सांगतांना अश्विनीची आजी बेबाबाई प्रकाश हरसोडे यांना आनंदाश्रु अनावर झाले.

अश्विनीला तिच्या यशाचे श्रेय तू कुणाला देशील? विचारले असता, या प्रश्नाचे उत्तर देताना अश्विनी म्हणाली, ‘प्रथमतः मला सतत प्रोत्साहन व पाठींबा देणाऱ्या वडिलांना तसेच रात्री जागून माझ्याकडून अभ्यास करून घेणाऱ्या उषा आईला तसेच मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी आणि वर्ग शिक्षक राजेंद्र बावस्कर व कलाशिक्षक अरविंद बडगुजर यांना देते. सत्काराप्रसंगी दिव्य चक्षू काका पंडित हरसोर्डे, ज्ञानेश्वर गुरव, लावण्या गुरव यांसह सत्कार संयोजक सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक विजय लुल्हे उपस्थित होते.

सत्कारार्थी समृद्धी विष्णू वानखेडे हिने ९६ टक्के गुणांनी घवघवीत यश प्राप्त केले. ओरियन सी. बी. एस. सी इंग्लिश मीडियम स्कूलमधून समृद्धीने द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच ती सिल्व्हर पदकाची मानकरी ठरली. समृद्धीला पेंटिंग या विषयात विशेष रुची आहे तसेच अवांतर वाचनाचा छंद आहे.

समृद्धीला शाल व वाचनीय ग्रंथ देऊन ज्येष्ठ साहित्यिक विजयराव रूम (सेवानिवृत्त अभियंता, महावितरण) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वडील विष्णू रामचंद्र वानखेडे सेंट्रल रेल्वेत (भुसावळ) लोको पायलट असून आई जयश्री वानखेडे जळगाव सिव्हील हॉस्पिटल मध्ये सिनियर परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. सत्काराप्रसंगी आई जयश्री वानखेडे, आजी रत्नाबाई गाढे, संयोजक विजय लुल्हे, वानखेडे, महेश शिंपी (सचिव, अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जळगाव) मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!