Home » महाराष्ट्र » मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह मंत्रिमंडळ ५ फेब्रुवारीला अयोध्या दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह मंत्रिमंडळ ५ फेब्रुवारीला अयोध्या दौऱ्यावर

मुंबई ( प्रतिनिधि ) दि.२४ , लोकसभा निवडणुकीचा धुमाकुळ तसेच आचारसंहिता लागण्याआधी भाजप आणि मित्रपक्ष प्रणीत सत्ता असलेले सर्व मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळासह अयोध्येला जाणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ ५ फेब्रुवारीला अयोध्या वारी करणार असल्याचे समजते. याबाबत एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी भाष्य केले होते.

अयोध्येतील मंदिरात दि २२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत प्रभू राम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या कार्यक्रमाला देशातील विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर अयोध्येत जाणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच आता भाजपने मित्रपक्षांसह आपले सर्व मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला अयोध्येत आणण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार एक वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यात त्रिपुरा, महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान, गोवा, आसाम, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्य देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ ५ फेब्रुवारीला अयोध्येला येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण मंत्रिमंडळासह प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतील. सोबतच ते शरयु किनारी महाआरती करतील आणि हनुमानगढीचेही दर्शन घेणार असल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांना निमंत्रण मिळाले होते. उद्धव ठाकरे यांना मात्र निमंत्रण उशिरा मिळाले होते. यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते की, संपूर्ण मंत्रिमंडळासह ते जाणार आहेत.
३१ जानेवारी ते ४ मार्च दरम्यान विविध राज्याचे मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ अयोध्याला जाणार आहेत .

२२ रोजी मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जवळजवळ ५ लाख भाविक अयोध्येत दर्शनासाठी दाखल झाले होते . तेथील सुरक्षा व्यवस्थेवर यामुळे मोठा ताण आल्याचेही दिसुन आले. आता विविध राज्यांचे मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ येत असताना पुन्हा एकदा अयोध्येतील सुरक्षेबाबत उत्तर प्रदेश राज्य प्रशासन आणि पोलीस यंत्रणेची दमछाक होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!