राजकोट ( वास्तव पोस्ट न्यूज ) : गुजरातच्या राजकोटमधील टीआरपी गेम झोनमध्ये शनिवारी संध्याकाळी लागलेल्या भीषण आगीत २७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये १२ लहान मुलांचाही समावेश असुन अनेकजण अद्याप बेपत्ता असल्याचेही सांगितले जात आहे. आग लागण्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नसुन आगीची दुर्घटना ही शॉर्ट सर्किटमुळे घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान “टीआरपी गेम झोनचे मालक आणि व्यवस्थापक दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती राजकोटचे पोलीस आयुक्त राजू भार्गव यांनी दिली. नरेंद्र मोदी यांनी ‘X’ वर पोस्ट करून शोक व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘राजकोटमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेमुळे खूप दुःख झाले आहे. ज्यांनी आपल्या जवळील लोकांना गमावले आहे, त्या सर्वांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींसाठी मी प्रार्थना करतोय. स्थानिक प्रशासन पीडितांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत”.
तसेच गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी पीडितांना तातडीने मदत करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले की, राजकोटमधील गेम झोनमध्ये आग लागल्याच्या घटनेत महापालिका आणि प्रशासनाला तात्काळ बचाव व मदत कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या असुन अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपये तर जखमींसाठी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली गेली आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी अहमदाबादमधील ४० डॉक्टरांचे पथकही राजकोटमध्ये पोहोचले आहे.
दरम्यान, गुजरातच्या पोलीस महासंचालकांनी पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना राज्यातील इतर सर्व गेम झोनची तपासणी करण्याचे तसेच अग्निसुरक्षा, बेकायदेशीर सुरू असणारे गेम झोन तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. ही प्रक्रिया पालिका आणि नगरपालिकांचे अग्निशमन अधिकारी तसेच स्थानिक यंत्रणांच्या समन्वयाने पार पाडण्यास सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी गुन्हे शाखेने चार जणांना ताब्यात घेतले आहे. त्यात टीआरपी गेम झोनचा मालक युवराज सिंग सोलंकी, त्याचा पार्टनर प्रकाश जैन, व्यवस्थापक नितीन जैन आणि राहुल राठोड अशी ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.
ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट :
राजकोट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये २७ मृतदेह पोस्टमार्टेमसाठी दाखल करण्यात आले असुन काही मृतांची ओळख पटवणे कठिण असल्याने ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट केली जात आहे. याकरिता मृतांच्या नातेवाईकांचे डीएनए सॅम्पल घेण्यात येत आहे.
