जळगाव | दि.९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – २०२४ लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जळगाव जिल्ह्यातही शासकीय यंत्रणेमार्फत आणि विविध संस्थांमार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. त्याचप्रमाणे जैन इरीगेशन सिस्टिम लि.च्या जैन फूडपार्क व एनर्जीपार्क मध्ये मतदान जनजागृती करण्यात आली. गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी आणि जळगाव जिल्हा लोकसभा २०२४ चे अधिकृत आयकॉन मदन रामनाथ लाठी आणि जळगाव मतदान केंद्रस्तरीय अधिकारी गिरीश रमनलाल भावसार (बीएलओ) उपस्थित होते.

त्यानंतर जळगाव जिल्हा लोकसभा निवडणूक २०२४ चे आयकॉन मदन लाठी यांनी मतदानाचे महत्त्व थोडक्यात पटवून दिले आणि १३ मे रोजी जास्तीत जास्त मतदान करुन सोबत घरातील सदस्य, आजुबाजुचे शेजारी – पाजारी व नातेवाईकांना विनंती करून जसे आपण उत्सव साजरे करतो त्या प्रमाणे १३ मे २०२४ रोजी हा उत्सव मोठ्या अभिमानाने साजरा करावा ही विनंती करून उपस्थितांना मतदानाची शपथ दिली.
बीएलओ गिरीश भावसार यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे मतदानाविषयी लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या महोत्सवात सहभागी होण्याच्या निमंत्रण पत्रकातील संदेशाचे वाचन केले.

त्यानंतर मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदान प्रक्रियेत झालेल्या बदलाची माहिती दिली. मतदार यादीत नाव शोधणे, SMS व ॲपचा वापर करण्यासंबंधी सुविधा समजावून सांगितली आणि उपस्थितांचे शंका निरसन केले.
