Home » महाराष्ट्र » राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल; मतदान केंद्रात केली EVM ची पूजा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल; मतदान केंद्रात केली EVM ची पूजा

बारामती दि.८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) : लोकसभा मतदारसंघात पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत मतदारांनी मोठ्या उत्साहात आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र मतदान प्रक्रियेदरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. एका मतदान केंद्रावर इव्हीएम मशीनची पूजा केल्याप्रकरणी त्यांच्यावर पुणे येथील सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर या आज ताट आणि दिवा घेऊन मतदान केंद्रावर पोहोचल्या. तेथे पोहचल्यानंतर त्यांनी चक्क इव्हीएम मशीनचीच पूजा केली. मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या निवडणूक अधिकाऱ्याच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी याप्रकरणी तक्रार नोंदवल्याने रुपाली चाकणकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झाली, तेव्हापासून रुपाली चाकणकर या त्यांच्या प्रचारात सक्रिय आहेत. यादरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याबाबत त्यांनी केलेली विविध वक्तव्ये चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर आता इव्हीएम मशीनची पूजा केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!