जळगाव | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – एरंडोल तालुक्यामध्ये नागदुली शिवारात दुपारी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. यावेळी शेतात अचानक वीज कोसळल्याने एका तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज दुपारी ४ वाजता घडली. विज कोसळली तेव्हा मयत तरुणाचे वडील देखील शेतात होते. मात्र सुदैवाने ते थोडक्यात बचावले.
मयत श्रीकांत आणि त्याचे वडिल दोघे सोबतच शेतात गेले होते. शेतात काही मजूरांसह ते शेतातील कुट्टी जमा करत असतांना काही अंतरावर असलेल्या श्रीकांतच्या अंगावर विज कोसळली. ही घटना त्याच्या वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी मजूरांच्या मदतीने श्रीकांत यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर श्रीकांत यास मृत घोषित केले. सदर घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद एरंडोल पोलीस स्टेशनला करण्यात आली.
मयत श्रीकांत भिका पाटील (३५ वर्ष) यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, दोन मुली तसेच दोन विवाहित बहिणी असा मोठा परिवार आहे. या घटनेमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
