Home » क्राईम » मुख्याध्यापक प्रदिप परदेशी यांना तक्रारदाराकडुन १,००० रु लाच स्विकारतांना रंगेहाथ अटक

मुख्याध्यापक प्रदिप परदेशी यांना तक्रारदाराकडुन १,००० रु लाच स्विकारतांना रंगेहाथ अटक

धुळे | दि.१९( वास्तव पोस्ट न्यूज) – आदर्श हायस्कुल, कुसुंबे ता. जि. धुळे या शाळेतील मुख्याध्यापक परदेशी यांनी सदर शाळेत आयोजित केलेल्या उपक्रमाकरीता खर्च झाल्याचे निमित्त करुन शाळेतील सर्व कार्यरत शिक्षक यांचे कडुन प्रत्येकी १,००० रुपये व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कडुन प्रत्येकी ८०० रुपये जमा करणेबाबत बैठक घेवुन सांगितले होते. त्यास तक्रारदार यांनी विरोध दर्शविला होता. तक्रारदार ह्या सोशल ॲड कल्चरल असोशिएशन, कुसुंबे ता. जि. धुळे संचलित आदर्श हायस्कुल, कुसुंबे ता. जि. धुळे येथे उपशिक्षिका पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे मुख्याध्यापक प्रदिप पुंडलीक परदेशी यांनी तक्रारदार यांना पैसे दिल्याशिवाय हजेरी रस्जिस्टरवर सही करण्यास नकार दिला होता. त्यामुळे तक्रारदार यांनी त्यांचेकडे मुख्याध्यापक परदेशी यांनी १,००० रु लाचेची मागणी केल्याची ला. प्र. विभाग, धुळे कार्यालयाकडे दुरध्वनीव्दारे माहिती दिली होती. त्यावरुन धुळे ला.प्र. विभागाच्या पथकाने कुसुंबे येथे जावुन तकारदार यांची तक्रार नोंदवुन घेतली होती.

सदर तक्रारीच्या अनुषंगाने दि. १८ मार्च रोजी पडताळणी केली असता मुख्याध्यापक प्रदिप परदेशी यांनी पंचासमक्ष १,००० रु लाचेची मागणी करुन दि. १९.०३.२०२४ रोजी सदर लाचेची रक्कम आदर्श विदयालय, कुसुंबे ता.जि. धुळे येथील मुख्याध्यापक यांचे कक्षात स्वतः स्विकारतांना मुख्याध्यापक परदेशी यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुध्द धुळे तालुका पो. स्टे. जि. धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक मंतिजसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, संतोष पावरा, प्रविण मोरे, प्रविण पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे या पथकाने केली आहे.

सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा. शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!