Home » कृषी » कजगाव येथे शॉर्ट सर्किट मुळे गुरांचा चारा खाक; महावितरणाचा भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याचे नुकसान

कजगाव येथे शॉर्ट सर्किट मुळे गुरांचा चारा खाक; महावितरणाचा भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याचे नुकसान

कजगाव | दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) दिपक अमृतकर | कजगाव येथील शेतकरी ईश्वर जगन्नाथ पाटील यांच्या शेतातील गुरांचा चारा दिनांक १७ रोजी शॉर्टसर्किट होऊन जळून खाक झाला.

सविस्तर वृत्त असे की ईश्वर जगन्नाथ पाटील यांच्या शेतातून महावितरणाच्या विजवाहक तारा गेलेल्या आहेत. दि१७ रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास या तारांमध्ये स्पार्किंग होऊन शेतात गुरांसाठी साठवलेल्या चाऱ्यावर ठिणगी पडून चाऱ्याने पेट घेतला. या आगीमध्ये सुमारे ७०० पुळे चारा जळून खाक झाला आहे. सुदैवाने आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला.

आगीची घटना घडल्या जागेपासून थोड्याच अंतरावर गुरे बांधलेली होती. तसेच धान्याच्या कणसांचा ढीगही जवळच होता. शेतकरी ईश्वर पाटील यांच्या ही बाब वेळीच लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. महावितरणच्या अशा हलगर्जीपणामुळे ऐन दुष्काळात गुरांच्या चारा जळून खाक झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. वारंवार अशा प्रकारच्या धोकादायक असलेले विजेचे तार, वाकलेले खांब, उघड्या डीपी संदर्भात ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी केल्यानंतरही संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.

ईश्वर पाटील यांच्या शेतात महावितरणच्या तारा लोंबकलेल्या अवस्थेत आहेत. जमिनीपासून पाच फुटाचां व्यक्ती सहज या तारांना हाताने स्पर्श करू शकतो अशा पद्धतीने या तारा लोंबकलेल्या आहेत. वारंवार सांगूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे ईश्वर पाटील यांनी सांगितले. तसेच दोन खांबांमधील अंतर हे सुमारे ३०० फूट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या आगीत झालेल्या नुकसानाची भरपाई महावितरणने द्यावी अशी मागणी शेतकरी ईश्वर पाटील यांनी केली आहे.

प्रतिक्रिया: माझ्या शेतातून गेलेल्या महावितरणच्या वीज वाहक तारा एकमेकांना घासल्याने स्पार्किंग होऊन गुरांचा चारा जळुन खाक झाला आहे. जवळच गुरही बांधलेली होती आता माझ्यासमोर उन्हाळ्यात गुरांना काय खाऊ घालू असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ईश्वर जगन्नाथ पाटील, शेतकरी ,कजगाव.

महावितरणचे अधिकारी पाहणी करून हे प्रकरण वरिष्ठ कार्यालयात पाठवू , जर स्पार्किंगने आग लागलेली असेल तर नियमानुसार त्यांना भरपाई मिळेल. पंकज घोडके, उपकार्यकारी अभियंता, नगरदेवळा विभाग.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!