नवी दिल्ली, दि.२१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -चंदिगढ महापौर निवडणुकीत आम आदमी पार्टीचे कुलदीप कुमार यांना सुप्रीम कोर्टानं विजयी घोषित केल आहे. आम आदमी पार्टी आणि कांग्रेसच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टानं हा महत्त्वाचा निर्णय सुनावला .
अनिल मसीह यांनी आपच्या उमेदवाराला मिळालेल्या आठ मतांशी छेडछाड केली होती, असा आरोप त्यांच्यावर आहे. सुप्रीम कोर्टने निवडणूक अधिकारी अनिल मसीह यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. मसीह यांना तीन आठवड्यांमध्ये या नोटिशीला उत्तर द्यायचं आहे.
आम आदमी पार्टीनं सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय म्हणजे ‘लोकशाहीचा विजय’ असल्याचं म्हटलं जात आहे. कोर्टाने सुनावणी दरम्यान सर्व बॅलेट पेपर व व्हीडिओ सादर करण्याचा आदेश सोमवारीच दिला होता. मंगळवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं आम आदमी पार्टीचे उमेदवार कुलदीप कुमार यांना विजयी घोषित केलं. ३० जानेवारीला मतगणनेत त्यांचा पराभव जाहीर केल्यानंतर त्यांनी सगळ्यात आधी हायकोर्टात व नंतर सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पत्रकारांशी बोलताना सुप्रीम कोर्टातील वकील शादान फरासत यांनी सांगितलं की, निवडणूक अधिकाऱ्यांना खोटं बोलल्या प्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचबरोबर बॅलेट पेपरशी छेडछाड केल्याप्रकरणी त्यांच्यावर आयपीसीच्या कलमांतर्गत कारवाई सुरू करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.
सरन्यायाधीश चंद्रचूड या प्रकारणाबाबत म्हणाले की, हे न्यायालय कर्तव्याप्रति कटिबद्ध आहे. विशेषतः कलम१४२ मध्ये उल्लेख केलेल्या कर्तव्यात संपूर्ण न्याय करण्याबाबत लिहिलं आहे. निवडणुकीत फसवणुकीच्या माध्यमातून लोकशाही प्रक्रियेला हरताळ फासता येणार नाही. निकालपत्रावरून हे स्पष्ट आहे की, याचिकाकर्त्यांना १२ मतं मिळाली होती. आठ मतं अवैध ठरवण्यात आली. पण ते चुकीच्या पद्धतीनं करण्यात आलं. अवैध ठरवलेल्या मतांपैकी प्रत्येक मत वैधरित्या याचिकाकर्त्यांच्या बाजूने टाकण्यात आलं होतं, असंही सरन्यायाधीशांनी म्हटलं.
