जळगाव | वास्तव पोस्ट वृत्तसेवा
जळगाव क्रिकेट लीग (JCL) २०२६ आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचली असून, अवघ्या जिल्ह्याचे लक्ष रविवारी होणाऱ्या ‘ग्रॅण्ड फायनल’कडे लागले आहे. रविवारी दि. २६ रोजी संध्याकाळी ६ वाजता जैन ड्रीम स्पेसेस च्या मैदानावर अमळनेर सुहास जायंट्स आणि जळगाव कोगटा किंग्ज हे दोन बलाढ्य संघ विजेतेपदासाठी आमनेसामने येतील.
जगदीश झोपेच्या वादळी खेळीने जळगाव कोगटा किंग्ज फायनलमध्ये
दरम्यान आज झालेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात जळगाव कोगटा किंग्जने जामनेर सातपुडा हिरोजवर ५ गडी राखून दणदणीत विजय मिळवत फायनलचे तिकीट पक्के केले. छत्रपती शिवाजी पुरस्कार विजेत्या आयशा खान यांच्या उपस्थितीत नाणेफेक पार पडली. जामनेर सातपुडा हिरोजचे कर्णधार शतायु कुलकर्णी यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
जामनेरचा डाव
सलामीवीर मानस विजय पाटील स्वस्तात बाद झाल्यानंतर राम राठोडने २८ चेंडूत ४३ धावांची (४ चौकार, ३ षटकार) आक्रमक खेळी केली. मात्र, एका बाजूने पडझड सुरू असताना प्रद्युम्न महाजनने ४३ चेंडूत नाबाद ६१ धावा ठोकून संघाला ५ बाद १६० धावांच्या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. त्याला क्रिषी नथानीने ३३ धावांची मोलाची साथ दिली. गोलंदाजीत जळगावच्या वतीने इम्पॅक्ट प्लेयर सागर भावसार आणि मनीष चव्हाण यांनी प्रत्येकी २ बळी टिपले.
जळगावचा थरारक पाठलाग
१६१ धावांचे लक्ष्य गाठताना जळगाव कोगटा किंग्जची सुरुवात खराब झाली. अवघ्या १२ धावांवर जितेंद्र नाईक बाद झाला. त्यानंतर ओम भोसलेने १७ चेंडूत ३२ धावांची आतषबाजी केली, पण तोही लवकर परतला. अशा कठीण प्रसंगी कर्णधार जगदीश झोपे खंबीरपणे उभा राहिला. झोपेने केवळ २५ चेंडूत ५ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांच्या मदतीने ६१ धावांची झंझावाती खेळी करत १७ व्या षटकातच विजय मिळवून दिला.
मान्यवरांच्या हस्ते गौरव
सामन्यानंतर झालेल्या पारितोषिक वितरण समारंभास जैन इरिगेशनचे मानव संसाधन विभाग वरिष्ठ सहकारी व्ही. एम. भट व इतर मान्यवर उपस्थित होते.
सामनावीर: जगदीश झोपे (६१ धावा)
मोस्ट सिक्सेस: जगदीश झोपे (४ षटकार)
डॉट बॉल्स स्पेशल: निलेश चौधरी (११ डॉट बॉल्स)

सुपर संडे महामुकाबला: शहराचा श्वास रोखणारा थरार!
रविवारी होणाऱ्या फायनलमध्ये एका बाजूला सातत्यपूर्ण कामगिरी करणारा अमळनेर सुहास जायंट्स आहे, तर दुसऱ्या बाजूला फॉर्मात असलेला जळगाव कोगटा किंग्ज. या दोन्ही संघांमधील चुरस पाहता, ‘विजेतेपदाची ट्रॉफी कोण उंचावणार?’ याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. क्रिकेट शौकिनांना रविवारी संध्याकाळी ६ वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अंतिम सामना:
अमळनेर सुहास जायंट्स
vs
जळगाव कोगटा किंग्ज
वेळ: रविवार दि २६ एप्रिल २०२६,
संध्याकाळी ६:०० वाजता
स्थळ: जैन ड्रीम स्पेसेस मैदान, जळगाव.
