जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क
विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीला बळ देण्यासाठी आणि सामाजिक उत्तरदायित्व जपण्यासाठी मालाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या (CSR) उपक्रमांतर्गत जळगाव येथील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात शिष्यवृत्ती वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात गरजू व गुणवंत ३१ विद्यार्थिनींना एकूण २ लाख ६६ हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.के. नारखेडे होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे यांनी प्रास्ताविक केले, तर संगीत विभागाच्या प्रा. ऐश्वर्या परदेशी यांनी महाविद्यालय गीत सादर केले.

शिक्षणानेच प्रगती शक्य : मान्यवरांचे मार्गदर्शन
मालाबारच्या प्रमुख अतिथी प्रियंका पाटील यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधताना शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. परिस्थितीवर मात करून शिक्षणाच्या जोरावर यश मिळवता येते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच मालाबार ट्रस्टच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. याप्रसंगी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनींपैकी किरण बहारे व कामिनी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ही मदत आमच्या शिक्षणासाठी मोठा आधार असून, यातून आम्ही आत्मनिर्भर होऊ, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.
महाविद्यालयाकडून उपक्रमाचे कौतुक
प्राचार्य डॉ. आर.के. नारखेडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मालाबार ट्रस्टच्या दातृत्वाचे कौतुक केले. महाविद्यालयातील विद्यार्थिनींना दिलेली ही मदत अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पात्र विद्यार्थिनींना धनादेश व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

या सोहळ्यात प्रा. शांताराम तायडे, डॉ. गणेश जेठवे आणि प्रा. उत्कर्ष पुण्यशील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मालाबार जळगाव शाखेचे व्यवस्थापक सुजीत नायर यांनी समाजातील वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी असे उपक्रम सुरूच राहतील, असे सांगितले. या प्रक्रियेत माजी प्राचार्य प्रा. डॉ. व्ही. जे. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
उपस्थिती व सहकार्य
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपक पवार व प्रा. ऐश्वर्या वाणी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मालाबार ट्रस्टचे अभिषेक भोसले, तुषार मराठे तसेच महाविद्यालयातील डॉ. राणी त्रिपाठी, प्रा. सुनील अहिरे, प्रा. कल्पना खेडकर, कामिनी धांडे व भावेश तायडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने प्राध्यापक, पालक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

