Headlines
Home » जळगाव » बार कौन्सिल निवडणूक: जळगावातून ॲड. रेखा कोचुरेंच्या रूपाने नवा इतिहास घडणार?

बार कौन्सिल निवडणूक: जळगावातून ॲड. रेखा कोचुरेंच्या रूपाने नवा इतिहास घडणार?

जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा २०२६ च्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, उद्या २४ मार्च रोजी होणाऱ्या मतदानाकडे संपूर्ण राज्याचे विधी क्षेत्राचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत जळगावच्या वकिली क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक वळण पाहायला मिळत आहे. जळगाव न्यायालयातून पहिल्यांदाच एका महिला वकिलाने बार कौन्सिलच्या रिंगणात उडी घेतली असून, ॲड. रेखा घनश्याम कोचुरे यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक विशेष चर्चेत आली आहे.

मैदानात दोन दिग्गज; चुरशीची लढत

​यंदा जळगाव शहरातून दोन प्रमुख चेहरे नशीब आजमावत आहेत. अनुभवी ॲड. गुलाबसिंग मानसिंग पाटील आणि पहिल्या महिला उमेदवार ॲड. रेखा घनश्याम कोचुरे यांच्यात ही प्रतिष्ठेची लढत होत आहे. जळगावचे प्रतिनिधित्व यापूर्वी ॲड. एल. एल. बेंडाळे आणि ॲड. भरत देशमुख यांसारख्या दिग्गजांनी केले आहे. मात्र, महिला उमेदवाराने या निवडणुकीत दावेदारी सांगण्याची ही पहिलीच वेळ असल्याने वकिली क्षेत्रात याची मोठी उत्सुकता आहे.

महिला आरक्षणाचा पेच आणि संधी

​बार कौन्सिलच्या एकूण २३ जागांसाठी ही निवडणूक होत असून, त्यामध्ये ५ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेनंतर दोन महिला सदस्यांची को-ऑप्ट मेंबर म्हणून निवड केली जाणार असल्याने एकूण सदस्य संख्या २५ होणार आहे. ॲड. रेखा कोचुरे या जळगावातून एकमेव महिला उमेदवार असल्याने त्यांना महिला वकिलांसह तरुण वकिलांचा मोठा पाठिंबा मिळण्याची चिन्हे आहेत.

खान्देशासाठी गौरवाचा क्षण

​जर ॲड. रेखा कोचुरे या निवडणुकीत विजयी झाल्या, तर खान्देशातून (जळगाव, धुळे, नंदुरबार) बार कौन्सिलवर निवडून जाणाऱ्या त्या पहिल्या महिला सदस्य ठरतील. यामुळे राज्याच्या कायदेशीर नकाशावर खान्देशचा दबदबा अधिक वाढणार आहे.
​उद्या दि.२४ मार्च रोजी होणाऱ्या या मतदानासाठी जळगाव जिल्हा न्यायालयातील वकिलांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून, निकाल कोणाच्या बाजूने लागणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!