Home » महाराष्ट्र » ‘जेएसडब्ल्यू स्टील’चे बनावट ट्रेडमार्क वापरणाऱ्यांना हायकोर्टाचा दणका

‘जेएसडब्ल्यू स्टील’चे बनावट ट्रेडमार्क वापरणाऱ्यांना हायकोर्टाचा दणका

मुंबई | वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क

​देशातील आघाडीची पोलाद उत्पादक कंपनी ‘जेएसडब्ल्यू स्टील’ने आपल्या नोंदणीकृत ट्रेडमार्कचा अनधिकृत वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कायदेशीर आघाडी उघडली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या वाणिज्य खंडपीठाने नुकताच एकतर्फी तातडीचा (ex-parte ad-interim) मनाई आदेश जारी केला. हा आदेश नाशिक जिल्ह्यातील लासलगाव व मनमाड भागात कार्यरत असलेल्या अनेक स्टील व्यापाऱ्यांविरुद्ध देण्यात आला असून, त्यामुळे राज्यातील बनावट पोलाद उत्पादन व्यापारावर एक मोठा घाव घालण्यात ‘जेएसडब्ल्यू’ला यश आले आहे.

​न्यायालयाने ज्यांच्याविरुद्ध हा आदेश दिला, त्यात मेसर्स पार्वती स्टील ट्रेडर्सचे मालक रामलाल लखाजी देवासी व हितेश देवासी, तसेच मेसर्स चामुंडा स्टील आणि आकाश स्टील पॉइंटचे मालक बागदाराम लखाराम देवासी यांचा समावेश आहे. हे सर्व व्यापारी लासलगाव-मनमाड पट्ट्यात कार्यरत होते. या व्यापाऱ्यांनी ‘जेएसडब्ल्यू’च्या कलरऑन प्लस (COLOURON+) आणि विश्वास प्लस (VISHWAS+) या दोन नोंदणीकृत ट्रेडमार्कशी हुबेहूब साधर्म्य असलेले बनावट ब्रँड वापरून ग्राहकांची फसवणूक केल्याचे उच्च न्यायालयाने प्रथमदर्शनी (prima facie) ग्राह्य धरले.

​न्यायालयाने मनाई आदेशाबरोबरच एक कोर्ट रिसिव्हर नियुक्त केला आणि त्यांना आरोपींच्या आवारात प्रवेश करून बनावट माल, नोंदी व साठा जप्त करण्याचे अधिकार दिले. या आदेशानुसार २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी, मेसर्स पार्वती स्टील ट्रेडर्स, मेसर्स चामुंडा स्टील आणि आकाश स्टील पॉइंट या तिन्ही व्यापारी प्रतिष्ठानांवर एकाच वेळी धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर बनावट माल सील करण्यात आला. विशेष म्हणजे, ही पहिलीच कारवाई नाही. जानेवारी २०२५ मध्येच ‘जेएसडब्ल्यू’ने लासलगाव व मनमाड पोलीस ठाण्यांत फौजदारी तक्रारी दाखल केल्या होत्या, ज्यानंतर पोलिसांनी छापे घालून बनावट माल जप्त केला होता.

​नाशिक जिल्हा हा कांदा-द्राक्षांप्रमाणेच स्टील व्यापाराचेही मोठे केंद्र आहे. लासलगाव-मनमाड परिसरात कृषी उपकरणे, शेड बांधकाम व ग्रामीण पायाभूत सुविधांसाठी पोलाद उत्पादनांना प्रचंड मागणी असते. या मागणीचा फायदा घेऊन काही व्यापारी दर्जेदार ब्रँडच्या नावाखाली निकृष्ट माल ग्राहकांच्या माथी मारत असल्याचे या प्रकरणातून उघड झाले आहे. ‘जेएसडब्ल्यू स्टील’ने स्पष्ट केले आहे की, कंपनीचा एक सक्रिय “ब्रँड प्रोटेक्शन प्रोग्रॅम” कार्यरत असून बाजारातील बनावट उत्पादनांवर सतत नजर ठेवली जाते. जेथे-जेथे बौद्धिक संपदा हक्कांचे उल्लंघन आढळेल, तेथे कायदेशीर कारवाई केली जाईल असा कंपनीने इशारा दिला आहे. या निर्णायक कारवाईमुळे नाशिक जिल्ह्यातील बनावट पोलाद व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, ग्राहक व वितरकांनी अधिकृत JSW डीलरकडूनच खरेदी करण्याचे आवाहन कंपनीने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!