जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क
क्रिकेटवेड्या जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ‘आर. सी. बाफना जळगाव क्रिकेट लीग (JCL) 2026 – पर्व २’ चे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या धर्तीवर होणाऱ्या या स्पर्धेची अधिकृत घोषणा संघटनेचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी केली.
मेहरुण परिसरातील कांताई नगर येथील ‘जैन ड्रीम स्पेसेस’ च्या हिरवळीवर हा T20 क्रिकेटचा थरार रंगणार आहे. या घोषणेवेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष युसूफ मकरा, सचिव अरविंद देशपांडे, खजिनदार राजेंद्र लढ्ढा आणि ॲड. सूरज जहागीर यांची प्रमुख उपस्थिती होती.
“Own The Game, Lead The League, Build Legacy”
या ब्रीदवाक्यासह सुरू होणारी ही लीग जळगावसह संपूर्ण कान्देशातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना आपली प्रतिभा सिद्ध करण्याची सुवर्णसंधी देणार आहे. ही स्पर्धा पांढऱ्या लेदर बॉलवर खेळविण्यात येणार असून, स्थानिक खेळाडूंना जागतिक दर्जाच्या नियमावलीनुसार खेळण्याचे हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे.
स्पर्धेची प्रमुख वैशिष्ट्ये:
• स्वरूप: पूर्णतः आयपीएल धर्तीवर आधारित T20 सामने.
• साहित्य: पांढरा लेदर बॉल आणि खेळाडूंसाठी आकर्षक रंगीत पेहराव.
• वेळ: क्रिकेटचा खरा आनंद देण्यासाठी दिवस-रात्र (Day-Night) सामने.
• उद्देश: स्थानिक क्रिकेटचा दर्जा उंचावणे आणि जळगावच्या क्रीडा संस्कृतीला नवीन ओळख मिळवून देणे.
"जळगाव व कान्देशातील क्रिकेटपटूंना मोठ्या व्यासपीठावर खेळण्याची संधी मिळावी आणि स्थानिक खेळाडूंना चालना मिळावी, हाच या आयोजनाचा मुख्य हेतू आहे. हा केवळ खेळ नसून जळगावकरांसाठी क्रिकेटचा उत्सव असेल. खेळाडूंसाठी स्वतःला सिद्ध करण्याची आणि व्यावसायिकांसाठी व्यवसायाची ही एक मोठी संधी आहे," असे प्रतिपादन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी यावेळी केले.
नोंदणी अनिवार्य:
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनने जाहीर केलेल्या खेळाडूंनाच संधी मिळणार आहे. पात्र खेळाडूंनी आपली अधिकृत नोंदणी करणे अनिवार्य असल्याचे संघटनेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

