जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क
शहरातील नागरिकांना घरगुती गॅस सिलिंडर वेळेवर मिळावा आणि वितरणातील अडथळे दूर व्हावेत, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी महत्त्वाची बैठक पार पडली. जिल्हाधिकारी रोहण घुगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत गॅस एजन्सी धारक, व्यवस्थापक आणि तिन्ही प्रमुख तेल कंपन्यांचे (BPCL, IOCL, HPCL) अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. बुकिंगनंतर सिलिंडर मिळण्यास होणारा विलंब आणि एजन्सी स्तरावरील तांत्रिक समस्यांचा जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर आढावा घेतला.
बैठकीत गॅस एजन्सी मालकांना सूचित करण्यात आले की, ग्राहकांनी बुकिंग केल्यानंतर किमान वेळेत त्यांच्या घरापर्यंत सिलिंडर पोहोचला पाहिजे. वितरणात पारदर्शकता ठेवण्यासाठी डिजिटल ट्रॅकिंग आणि समन्वयावर भर देण्याचे आदेश यावेळी देण्यात आले आहेत.

“जळगावमध्ये गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून ग्राहकांनी घाबरण्याचे कारण नाही. सर्वांना वेळेवर सिलिंडर मिळेल, यासाठी प्रशासन व कंपन्यांकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत,” असे आश्वासन जिल्हाधिकारी घुगे यांनी यावेळी दिले.
उपस्थित प्रतिनिधी:
या बैठकीला किशोर सपके (हर्षिल गॅस), सौरभ चौबे (कौशिकी भारत गॅस), ललित वाणी (रेखा गॅस), भूषण चौधरी (भूषण गॅस), अभिषेक पाटील (समर्थ गॅस, जामनेर) यांच्यासह हेमंत चौधरी, शुभम चौबे, राहुल ललवाणी, रमेश विसपुते, सुभाष जैन आणि सौरभ पाटणी आदी उपस्थित होते.
प्रशासन आणि एजन्सी यांच्यातील या समन्वय बैठकीमुळे शहरातील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
