पुणे l वास्तव पोस्ट : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड १८ मार्च रोजी होणार असून, या पदासाठी बारामती पंचायत समितीचे माजी सभापती करण खलाटे यांचे नाव आघाडीवर आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या नेतृत्वाच्या पोकळीत बारामतीला पुन्हा संधी मिळणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष
अध्यक्ष व विविध विषय समित्यांच्या सभापती निवडीचे सर्व अधिकार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ टाकतात, यावर सर्व गणिते अवलंबून आहेत. बारामतीत सध्या खलाटे यांच्या नावाची जोरदार चर्चा असून, पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे.

अजित पवारांच्या विकासकार्याचा वारसा पुढे नेण्याचे आव्हान
गेल्या अडीच दशकांपासून स्व. अजित पवार यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण पुण्याचा चेहरामोहरा बदलला. त्यांच्या निधनानंतर विकासाची गती मंदावल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. हे अध्यक्षपद ‘सर्वसाधारण’ गटासाठी आरक्षित असल्याने बारामतीला झुकते माप मिळावे, अशी मागणी जोर धरत आहे. खलाटे यांनी नींबूत-कांबळेश्वर गटातून विजय मिळवला असून, त्यांनी आपली इच्छा पक्षाकडे बोलून दाखवली आहे.
पंचायत समितीतील कामाचा दांडगा अनुभव
करण खलाटे यांनी पंचायत समिती सभापती म्हणून काम करताना शासनाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि तरुण नेतृत्व ही त्यांची जमेची बाजू मानली जात आहे. बारामती तालुक्यातील संपतराव देवकाते, योगिता कोकरे, सतीश खोमणे आणि विश्वास देवकाते यांनी यापूर्वी हे पद भूषवले आहे. खलाटे यांच्या रूपाने पुन्हा एकदा बारामतीला नेतृत्व मिळाल्यास विकासाचा वेग वाढेल, असा विश्वास सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.
इतर तालुक्यांतील इच्छुकांचीही मोर्चेबांधणी
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असली, तरी अध्यक्षपदासाठी केवळ बारामतीच नव्हे तर इतर तालुक्यांतील सदस्यही आग्रही आहेत. प्रादेशिक समतोल राखण्यासाठी पक्षाला कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा आता चुरशीची झाली असून १८ मार्चला नक्की कोणाची वर्णी लागते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

