वास्तव पोस्ट l जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे नाशिक येथे आयोजित चौथ्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या जागतिक स्तरावरील व्यासपीठावर जळगाव येथील अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी आपल्या बहारदार ‘कातकरी नृत्याने’ उपस्थितांची मने जिंकत जळगावचा झेंडा दिमाखात फडकवला.
१९ देशांतील प्रतिनिधींसमोर सादरीकरण
नाशिक येथे संपन्न झालेल्या या तीन दिवसीय संमेलनात जगभरातील १९ देशांतील मराठी भाषिक नागरिक सहभागी झाले होते. संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी बालरंगभूमी परिषदतर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात अनुभूती स्कूलच्या विद्यार्थिनींनी जोशपूर्ण सादरीकरण केले. नृत्य शिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या चिमुरड्यांनी कातकरी लोकसंस्कृतीचे दर्शन घडवले.

मिळालेल्या संधीचे केले सोने
बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती (मुंबई) च्या अध्यक्षा ॲड. निलम शिर्के सामंत व प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल यांच्या विशेष प्रयत्नातून जळगावच्या या बालकलाकारांना ही संधी उपलब्ध झाली होती. आपल्या अष्टपैलू सादरीकरणाने विद्यार्थिनींनी या संधीचे अक्षरशः सोने केले.
मान्यवरांच्या हस्ते गौरव
सादरीकरणानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व सहभागी कलाकारांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये खालील विद्यार्थ्यांचा समावेश होता:
नृत्य कलाकार: डिंपल चौधरी, भूमिका चौधरी, रेणुका पवार, पूर्वी भावसार, चिन्मयी जंजाळकर, स्वरा महाजन, सुंदरम चिमकर, विद्या सपकाळे, चेतन धनगर, हर्षिता निकुंभ.
वादक चमू: मोहित सोनवणे, ललित पवार, वेदांत जडे, रोहन चव्हाण, सचिन महाजन.
संघप्रमुख: ज्ञानेश्वर सोनवणे.
शाळा प्रशासनाकडून कौतुक
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी, संस्थचे अध्यक्ष अतुल जैन आणि संचालिका निशा अनिल जैन यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे मनापासून कौतुक केले आहे. या यशामुळे जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.

