Headlines
Home » महाराष्ट्र » नागपूरमध्ये अन्न-औषध सुरक्षेला आधुनिकतेची नवी ढाल

नागपूरमध्ये अन्न-औषध सुरक्षेला आधुनिकतेची नवी ढाल

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे ‘अन्न व औषध प्रशासन, नागपूर’ च्या विभागीय कार्यालय इमारतीचे लोकार्पण केले. खाद्य पदार्थातील भेसळ शोधून काढण्यासाठी प्रयोगशाळा व अत्याधुनिक यंत्र सामुग्री आदी सुविधा येथे उपलब्ध झाल्या आहेत.

अन्न व औषधी प्रशासन, नागपूर विभागीय कार्यालयाची नूतन इमारत ५ मजली असून इमारतीचे बांधकाम १५०० चौरस मीटरवर करण्यात आले आहे. इमारतीच्या पहिल्या माळ्यावर औषध विभाग व दुसऱ्या माळ्यावर अन्न विभाग कार्यान्वित होणार आहेत. इमारतीमध्ये अत्याधुनिक उपकरणे असलेली प्रयोगशाळा उर्वरित जागेत असेल. या इमारतीचे बांधकाम १५ कोटी १७ लाख रुपयांच्या निधीतून करण्यात आले आहे.

नागपूर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे अन्नपदार्थांची वाहतूक व वितरण येथून मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे अन्नपदार्थ साठविण्यासाठी शीतगृहे, वेअर हाऊस, लॉजिस्टिक पार्क येथे मोठ्या प्रमाणात आहेत. नागरिकांना सुरक्षित पदार्थ उपलब्ध होण्यासाठी तसेच औषधे व खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषधी नमुन्यांची दर्जात्मक व गुणात्मक विश्लेषण करणे ही महत्त्वाची बाब आहे.

या प्रयोगशाळेत अद्ययावत यंत्र सामग्री व उपकरणे प्राप्त झाल्यामुळे अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे दैनंदिन कामकाज अधिक प्रभावी व गतिमान होण्यास मदत होणार आहे. यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!