Home » जळगाव » माथाडी कामगारांना प्रवेश व काम नाकारल्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

माथाडी कामगारांना प्रवेश व काम नाकारल्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

जळगाव ( वास्तव  पोस्ट ) : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., एम.आय.डी.सी. जळगाव येथील एलपीजी रिफिलिंग प्लांटमध्ये नोंदणीकृत माथाडी कामगारांना प्रवेश व काम नाकारण्यात आल्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज तातडीची व सखोल बैठक घेण्यात आली.

उत्तर महाराष्ट्र माथाडी इतर श्रमजीवी असंरक्षित व असंघटीत कामगार संघटनेने माथाडी मंडळात नोंदणीकृत असलेल्या कामगारांना दि. ३ डिसेंबर २०२५ पासून कामावर येण्यास मज्जाव करण्यात आल्याचे व प्लांट आवारात प्रवेश नाकारण्यात आल्याची तक्रार केली होती.

“निवडणूकीच्या दिवशी मतदानासाठी सुट्टी घेतल्याच्या कारणावरून कोणत्याही नोंदणीकृत माथाडी कामगाराला कामावरून वंचित ठेवणे योग्य नाही. सर्व कामगारांना उद्या सकाळच्या शिफ्टपासून तात्काळ कामावर रुजू करून घ्यावे,” असे स्पष्ट व सक्त निर्देश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिले.

जिल्हाधिकारी यांनी पुढे नमूद केले की,
कामगारांचे कायदेशीर हक्क व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, तसेच उद्योग क्षेत्रातील नियमित कामकाज निर्विघ्न राहावे, यासाठी सर्व संबंधितांनी आवश्यक समन्वय व जबाबदारीने कार्य करावे.

सदर बैठकीस अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव (प्रतिनिधी), सहाय्यक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष जळगाव माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ जळगाव, व्यवस्थापक भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन व हिंदुस्थान पेट्रोलियम लि., एम.आय.डी.सी. जळगाव, सर्व वाहतूक ठेकेदार/ट्रान्सपोर्टर/डिलर – बीपीसीएल व एचपीसीएल, एम.आय.डी.सी. जळगाव, अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र माथाडी व इतर श्रमजीवी असंरक्षित व असंघटीत कामगार संघटना जळगाव, जिल्हा पुरवठा अधिकारी जळगाव हे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!