Headlines
Home » महाराष्ट्र » मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आपले वर्षभराचे वेतन

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आपले वर्षभराचे वेतन

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्यात मुसळधार पाऊस व महापुरामुळे शेती आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बाधित नागरिकांना मदत पुरविण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतःचा वर्षभराचा पगार मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला. मंत्री महाजन यांनी आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी वर्षभराच्या आपल्या पगाराचा धनादेश ₹३१,१८,२८६ सुपूर्द केला. ही रक्कम राज्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकरी, कष्टकरी व सामान्य जनतेच्या मदतीसाठी समर्पित केली आहे.

याप्रसंगी मंत्री महाजन म्हणाले की, राज्यातील अनेक भागांमध्ये नैसर्गिक आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व आर्थिक नुकसान झाले आहे. अशा संकटसमयी प्रत्येक जबाबदार नागरिकाने शक्य ती मदत करणे, ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. सरकार आपली जबाबदारी पार पाडत असतानाच, नागरिक म्हणून आपणदेखील पुढे येऊन हातभार लावणे गरजेचे आहे. माझ्या या छोट्याशा प्रयत्नातून इतरांनाही प्रेरणा मिळावी, हीच मनापासून इच्छा आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्य मंत्रिमंडळातील सहकारी सदस्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!