Home » महाराष्ट्र » मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ; पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ; पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस

जालना, दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज )– मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या आठवड्यात अंतरवाली सराटीत उपोषणाला सुरुवात केली होती. यावेळी चौथ्यांदा आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी प्रकृती अधिकच खालावली आहे.

सविस्तर वृत्त असे की मराठा आरक्षणाचा कायदा तातडीने लागू व्हावा, या मागणीसाठी आज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने आज सकाळपासून मनोज जरांगे यांच्या नाकातून रक्तस्त्राव सुरु झाला होता. त्यामुळे मराठा आंदोलकांची चिंता वाढली, तसेच उपोषणस्थळी समर्थक व आंदोलकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे. याठिकाणी असणाऱ्या अनेक महिलांनी जरांगेची खालावलेली स्थिती बघुन रडारड सुरु केली होती .

आंदोलनस्थळी खासगी डॉक्टरांचे एक पथक दाखल झाले होते. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आज सकाळी मनोज जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली. मात्र, जरांगे यांनी डॉक्टरांना माघारी धाडले होते. परंतु मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अधिकच ढासळण्यास सुरुवात झाल्याने अखेर काही जवळचे सहकारी आणि नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी समजवल्यानंतर मनोज जरांगे पाटील वैद्यकीय उपचार घेण्यास होकार दिला .

डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु केले असून त्यांना सलाईन लावली आहे. पुढील काही काळ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून राहतील. तसेच व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी त्यांना इंजेक्शन देण्यात आले आहे. मनोज जरांगे यांचा रक्तदाब आणि ऑक्सिजनची पातळीही डॉक्टरांनी तपासली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!