जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा
शासनाचे बदली धोरण आणि भारतीय संविधानातील समतेच्या तत्त्वाचे उघड उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप करत, जळगाव येथील यांत्रिकी विभागीय पथकाचे कार्यकारी अभियंता धनंजय वामन पाटील यांच्याविरोधात तक्रारीचा मोर्चा उघडण्यात आला आहे. नशिराबाद येथील सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन सुरेश रंधे यांनी नाशिक येथील यांत्रिकी मंडळाच्या मुख्य अभियंत्यांकडे ही तक्रार दाखल केली असून, यामुळे विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय?
नितीन रंधे यांनी दि. १ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे की, कार्यकारी अभियंता धनंजय वामन पाटील हे वर्ग-१ दर्जाचे वरिष्ठ अधिकारी आहेत. शासनाच्या नियमानुसार, ठराविक कालावधीनंतर अशा अधिकाऱ्यांची बदली होणे अनिवार्य असते. मात्र, पाटील हे अनेक वर्षांपासून एकाच जिल्ह्यात आणि एकाच पदावर ठाण मांडून बसले आहेत. इतर अधिकाऱ्यांच्या बदल्या वेळेवर होत असताना, पाटील यांच्या बाबतीत मात्र हे नियम शिथिल केले जात असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

संविधानातील ‘कलम १४’ चा हवाला
तक्रारदाराने आपल्या अर्जात प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इतर अधिकाऱ्यांसाठी एक न्याय आणि धनंजय पाटील यांच्यासाठी दुसरा न्याय, असे धोरण राबवले जात असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे भारतीय संविधानातील कलम १४ (समानतेचा अधिकार) मधील तत्त्वांचा भंग होत असून, प्रशासनातील इतर प्रामाणिक अधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना रंधे यांनी व्यक्त केली आहे.
“एका विशिष्ट अधिकाऱ्याला अभय देऊन विशेष संरक्षण का दिले जात आहे? प्रशासकीय नियमावली सर्वांसाठी समान असायला हवी,” असे रंधे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
प्रशासनाला दिला इशारा
या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करण्यात यावी आणि बदली धोरणानुसार योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जर प्रशासनाने या तक्रारीची दखल घेऊन तातडीने कारवाई केली नाही, तर नाशिक येथील यांत्रिकी मंडळ मुख्य अभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा नितीन रंधे यांनी दिला आहे.
विभागात चर्चांना उधाण
या तक्रारीमुळे यांत्रिकी विभागात अंतर्गत गटबाजी आणि प्रशासकीय कारभाराची चर्चा रंगली आहे. आता चेंडू नाशिकच्या मुख्य अभियंत्यांच्या कोर्टात असून, ते या प्रकरणात कडक पाऊल उचलतात की प्रकरण थंड बस्त्यात टाकले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

