ठाणे | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – कल्याण, भिवंडी, ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी आज नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. तत्पुर्वी मोदींच्या सभेला कल्याणच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांचे मानापमान नाट्य चांगलेच रंगले आहे. जिल्हाप्रमुखांना व्यासपीठावर स्थान न दिल्याने कल्याण मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी थेट राजीनामाच दिला आहे.
वर्षभरापूर्वी अरविंद मोरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातुन शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर कल्याण आणि मुरबाड जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली होती. सध्या अरविंद मोरे कल्याणचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदेंचा प्रचारात व्यस्त आहेत. मोदींच्या सभेत व्यासपीठावर जागा न दिल्याने नाराज होऊन अरविंद मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित आपली नाराजी व्यक्त केली आणि राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली आहे.
कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणाऱ्या जाहीर सभेसाठी व्यासपीठावर निमंत्रीत पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हाप्रमुखांना निमंत्रण नाही. आमदार, शहरप्रमुख, आमदार हे व्यासपीठावर निमंत्रीत असताना शिवसेना पदाच्या प्रोटोकॉलप्रमाणे यजमान जिल्हा प्रमुखाला व्यासपीठावर उपस्थित राहण्याचा मान मिळायला हवा होता. पण जाणीवपूर्वक माझे नाव डावलले असल्याने मी माझ्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. असे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.