मुंबई, दि. २३ ( वास्तव पोस्ट न्यूज )– ५७ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्कारासहीत सांस्कृतिक कार्य विभागाकडून कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलावंतांना देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचा वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते.
यावेळी मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात आला. २०२० सालचा चित्रपती व्ही.शांताराम योगदान पुरस्कार दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांना, २०२१ चा चित्रपती व्ही.शांताराम योगदान पुरस्कार ज्येष्ठ गायक रवींद्र साठे यांना, तर २०२२ चा चित्रपती व्ही.शांताराम योगदान पुरस्कार दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात आला. तसेच २०२० चा व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार दिवंगत अभिनेते कै.रवींद्र महाजनी यांना, २०२१ चा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांना, तर २०२२ चा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांना प्रदान करण्यात आला.
आज प्रदान केलेले सर्व पुरस्कार या प्रतिभावान कलावंतांना प्रदान करून राज्य शासनाचा मान वाढला असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच राज्य शासनाच्या वतीने जगाला हेवा वाटेल अशी चित्रनगरी बनवण्याचा आपला मानस असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. तसेच राज्यात ७५ नाट्यगृहे तयार करत असल्याचे देखील यावेळी जाहीर केले.
याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार प्रा.मनीषा कायंदे तसेच कला क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
