Headlines
Home » जळगाव » रोखठोक : खाकीचा रुबाब फक्त ‘रील’वर? जळगावात गुन्हेगारांचे ‘रिअल’ राडे; पोलिसांचा वचक हरवला!

रोखठोक : खाकीचा रुबाब फक्त ‘रील’वर? जळगावात गुन्हेगारांचे ‘रिअल’ राडे; पोलिसांचा वचक हरवला!

जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा

जळगाव : सोशल मीडियावर शस्त्रे नाचवणारे किंवा भाईगिरीचे संवाद टाकणाऱ्या तरुणांच्या मुसक्या आवळण्यात पोलीस सध्या धन्यता मानत आहेत. मात्र, दुसरीकडे जळगाव शहरात ‘रिअल’ भाईगिरीने सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहे. दिवसाढवळ्या होणारी लूटमार, घरफोड्या आणि अवैध धंद्यांकडे होणारे सोयीस्कर दुर्लक्ष पाहता, पोलिसांचा धाक केवळ सोशल मीडियापुरताच मर्यादित राहिला आहे की काय? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

शहरास गुन्हेगारीचा विळखा; वास्तवाकडे मात्र कानाडोळा

शहरात दररोज दिवसाढवळ्या चोरी, लूटमार आणि महिलांच्या छेडछाडीच्या घटना घडत आहेत. अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून, खून आणि दमदाटीच्या घटनांमुळे दहशतीचे वातावरण आहे. धक्कादायक बाब म्हणजे, भरवस्तीत सट्टा आणि जुगाराचे तसेच मद्द्याचे अड्डे खुलेआम सुरू आहेत. तक्रार आली तरच कारवाई करू, ही पोलिसांची भूमिका असल्यामुळे गुन्हेगारांचे फावत असल्याचा आरोप होत आहे.

महत्त्वाचे मुद्दे: ज्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे:

अवैध रेतीची रात्रीची ‘वारी’: रात्री अपरात्री निवासी कॉलनींमध्ये रेतीची साठवणूक केली जाते. अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीमुळे पर्यावरणासोबतच रस्त्यांचीही वाट लागली आहे.
निवासी भागात मद्यविक्री: अनेक रहिवासी भागात छुप्या पद्धतीने किंवा हॉटेलच्या नावाखाली मद्यविक्री जोरात सुरू आहे, ज्यामुळे कौटुंबिक शांतता भंग होत आहे.
आरोग्याशी खेळ: खुल्यावर होणारी मासविक्री आणि खाद्यपदार्थांची अस्वच्छ विक्री यावर कोणाचेही नियंत्रण नाही. जीवनावश्यक वस्तूंमध्ये होणारी भेसळ नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे.
वाहतुकीचा फज्जा: अवैध प्रवासी वाहतुकीमुळे शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी होत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
शस्त्रसाठा आणि टोळ्या: सोशल मीडियावरील रिल्स शोधण्यापेक्षा, प्रत्यक्षात शहरात कोणत्या टोळ्या सक्रिय आहेत आणि अवैध शस्त्रे कुठून येत आहेत, याचा शोध घेणे गरजेचे आहे.
गस्तीचा अभाव: उपनगरांमध्ये रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त कमी झाल्यामुळे घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे.

सोशल मीडियापेक्षा ग्राउंडवर या!

सोशल मीडियावर भाईगिरी करणाऱ्यांवर कारवाई करणे चुकीचे नाही, पण जेव्हा तीच ऊर्जा शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी वापरली जाईल, तेव्हाच ‘खाकी’चा खरा सन्मान होईल. जळगावातील सामान्य जनता सध्या असुरक्षिततेच्या सावटाखाली आहे. केवळ करमणुकीच्या पोस्टवर वचक ठेवण्यापेक्षा, रस्त्यांवर धुमाकूळ घालणाऱ्या खऱ्या गुन्हेगारांना पोलिसांचा हिसका कधी मिळणार? हाच खरा प्रश्न आहे.

“भ्रम नको, फक्त वास्तव” हे ब्रीद घेऊन चालणाऱ्या ‘वास्तव पोस्ट’च्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला जाब विचारत आहोत की, जळगाव शहर सुरक्षित करण्यासाठी ठोस पावले कधी उचलली जाणार?

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!