मुंबई | दि.२९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतकाची जागतिक कीर्तिमानाची नोंद जॅन निकोल लॉफ्टी ईटनच्या नावावर झाली आहे. नामिबियाचा मध्यफळीतील या फलंदाजाने नेपाळविरुद्ध अवघ्या ३३ चेंडूंत शतक झळकावले. टी-२० क्रिकेटमध्ये यापूर्वी सर्वात वेगवान शतकाचा विक्रम कुशलच्या नावावर होता. कुशलने ३४ चेंडूंत शतक झळकावले होते.
जॅन निकोल लॉफ्टी ईटनने ३६ चेंडूंत ११ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १०१ धावा केल्या. त्याच्या या वादळी शतकामुळे नामिबियाने २० षटकांत ४ बाद २०६ धावा केल्या. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४० पेक्षा कमी चेंडूंत शतक झळकावणारा जॅन निकोल लॉफ्टी इटन हा सातवा फलंदाज ठरला. काही दिवस हा विश्वविक्रम टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नावे होता. रोहितने श्रीलंके विरुद्ध इंदोर येथे ३५ चेंडूत शतक ठोकले होते.
तिरंगी टी-२० मालिकेतील या लढतीत जॅन निकोल लॉफ्टी ईटनने १८ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर पुढील ५० धावा त्याने अवघ्या १५ चेंडूत ठोकल्यात. २० व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. गोलंदाज अविनाश बोहराच्या चेंडूवर गुलसनने त्याचा झेल घेत त्याची ही धमाकेदार खेळी संपुष्टात आणली. जॅन ११ व्या षटकात जेव्हा फलंदाजीला आला होता, त्यावेळी नामिबियाची ३ बाद ६२ अशी अवस्था होती. यानंतर जॅन निकोल लॉफ्टी ईटनने या डावात २८०.५६ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याने मलान क्रुगरच्या साथीने त्याने चौथ्या विकेटसाठी ५२ चेंडूंत १३५ धावा जोडून नामिबियाची धावसंख्या ४ बाद २०६ धावांपर्यंत पोहोचवली.
नेपाळच्या डावात लॅफी-ईटनने गोलंदाजीतही अप्रतिम कामगिरी केली आणि तीन षटकांत २९ धावांत २ बळी घेतले. विजयासाठी २०७ धावांचा पाठलाग करतांना नेपाळची चांगलीच दमछाक झाली. दीपेंद्र सिंग ४८ व रोहीत पॉडेल याने २४ चेंडूत ४२ धावां यांच्या व्यतिरिक्त इतर फलंदाज आपली छाप सोडू शकले नाही. १८.५ षटकात नेपाळचा डाव १८६ धावांवर संपुष्टात आला. नामिबिया कडून रूबेलने ४ बळी घेतले. अशा प्रकारे हा सामना नामिबियाने २० धावांनी जिंकला
