वरणगाव ( वास्तव पोस्ट ) : एका वर्गातून पुढच्या वर्गात जाणे म्हणजे शिक्षण नाही तर ज्ञान मिळवणे व त्या ज्ञानाचा प्रत्यक्षपणे दैनंदिन जीवनात वापर करणे याला शिक्षण म्हटले पाहिजे. पाठ्यपुस्तकातील धड्यांचा परीक्षेपुरता अभ्यास न करता जीवनात देखील त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. संकटाला घाबरू नका, नीतिमत्ता व प्रामाणिकपणा सोडू नका. दुसऱ्यांच्या भावना जपून घेतल्या पाहिजे. विद्यार्थ्यांनी गुणांपेक्षा ज्ञानाला महत्त्व दिले पाहिजे. जिद्दीने अभ्यास करा, परीक्षेचे मार्क हे गुणवत्तेचे मार्क नसतात. संघर्ष करा व उंच स्वप्न पाहून आई-वडिलांचे स्वप्न साकार करा. मोठे झाल्यानंतर उंच भरारी घ्या. ज्ञानाने परिपूर्ण व्हा, मात्र या काळात आई-वडिलांचे व शिक्षकांचे भान ठेवा. आई-वडिलांचे स्वप्न साकारण्यासाठी संघर्ष करा असे प्रतिपादन प्राध्यापक जतीन मेढे यांनी शिंदी तालुका भुसावळ येथे आयोजित कार्यक्रमावेळी केले.
श्रीकृष्ण हायस्कूल शिंदी तालुका भुसावळ येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप व वार्षिक बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्र कोल्हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष प्रवीण नेमाडे, संस्थेचे सचिव सुभाष कोल्हे, प्रा.जतिन मेढे, महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळाचे सहसचिव सुनील वानखेडे, पंडित नेहरू विद्यालय वाराडसीम येथील उपशिक्षक गिरीश नेमाडे, जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक समाधान जाधव, संस्थेचे विश्वस्त शरद ढाके, भोजराज महाजन, पांडुरंग नेहते, डिगंबर कोल्हे, ऋषिकेश महाजन, महेंद्र कोल्हे, मुख्याध्यापक बी.पी. वारके उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वतीचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यानंतर इयत्ता दहावीतील प्रणाली जाधव, यश पारधी, प्रसाद चौधरी विद्यार्थ्यांनी निरोप समारंभासाठी मनोगत व्यक्त केले. भविष्यात कुठेही गेलो तरी शाळेला विसरता येणार नसल्याचे सांगत शाळेने आमच्यावर चांगले संस्कार केल्याने आम्ही घडलो. एन.एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी बाहेर पडत असताना येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची व जिद्दीने मार्ग काढण्याचा सल्ला दिला. मुख्याध्यापक बी.पी. वारके यांनी विद्यार्थ्यांना संकटात खचून न जाता धीटपणे पुढे जाण्याचा सल्ला दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी.जी. राजपूत व एम.एस. महाजन यांनी केले. तर आभार आर.डी. महाजन यांनी मानले.
मोबाईलचा वापर योग्य करायला शिका : उपशिक्षक सुनील वानखेडे
मोबाईल हा जगातला महागुरू आहे मोबाईलमुळे ग्रामीण व शहरी असा भेद संपलेला आहे. या मोबाईलचा योग्य वापर केल्यास तुम्हाला जगातील हवी ती माहिती एका क्लिक वर मिळत असते. याचा योग्य वापर केल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य सुखदायी समृद्धी होण्यास मदत होईल. याकरिता मोबाईलचा वापर योग्य करायला शिका.
दहावीच्या विद्यार्थ्यांनी दिली भेट वस्तू
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले स्मरण शाळेत राहावे यासाठी भेट वस्तू देऊन आभार व्यक्त केले. स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक व शैक्षणिक साहित्य यांच्या वतीने देण्यात आली.
