सोलापूर दि .०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या घटनांनी अक्षरश: टोक गाठलं आहे. मंगळवेढ्यात पोलीस उपनिरीक्षकावर ढाबा चालकाने हल्ला केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पोलीसांच्याच सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण झाला आहे . मुंबईच्या दहीसरमध्ये ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर काल गोळीबाराची घटना घडली. त्याआधी चाळीसगावात भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबाराची घटना घडली होती. तसेच गेल्या आठवड्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शहरप्रमुखावर पोलीस ठाण्यात गोळ्या झाडल्या होत्या. यानंतर जळगाव येथे मनपा अभियंत्यास मारहाण , वाळू माफियांकडून उपजिल्हाधिकारी यांचेवर प्राणघातक हल्ला तसेच जळगावमध्येच दोन दिवसांपूर्वी मद्यधुंद तरुणांनी एका हॉटेल मालकासह स्थानिक १० ते १५ नागरिकांना अमानुषपणे मारहाण केली होती. त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात पोलीस उपनिरीक्षकावर ढाबा चालकाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे .
रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवलेल्या ढाब्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षक अंकुश वाघमोडे आणि गाडी चालकावर मंगळवेढा तालुक्यातील मरवढे येथील ढाबा चालकासह सात ते आठ जणांनी लाठ्या काठ्यांनी हल्ला केला. यावरून संबंधित परिसरात आरोपींची दहशत किती आहे ते या प्रकरणातून समोर येत आहे. या घटनेवर स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जात असुन या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. या घटनेत पोलीस उपनिरीक्षक अंकुश वाघमोडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मंगळवेढा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हल्ल्यामागील नेमकं कारण काय ?
मरवढे येथील महाराजा ढाबा रात्री उशिरापर्यंत सुरू होता. ढाबा उशिरापर्यंत का सुरू ठेवला? बंद करा असे सांगताच,ढाबा चालकासह इतर सात ते आठ अनोळखी तरूणांनी पोलीस उपनिरीक्षक अंकुश वाघमोडे आणि गाडी चालकाला मारहाण केली. आरोपींनी पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांच्या गाडी चालकाला लाकडी दांडके, काठ्यांनी डोक्यात आणि हाता पायावर मारून गंभीर जखमी केलं आहे.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अंकुश वाघमोडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर चालक किरकोळ जखमी झाला आहे. या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात ढाबा चालकासह इतर संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.
