जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने पं. वसंतराव चांदोरकरांच्या २३ व्या स्मृती दिनाच्या पूर्व संध्येस म्हणजे रविवार दि. ७ जुलै २०२४ रोजी “विरासत” मैफिलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मैफिलीस भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे. ही मैफिल कांताई सभागृहात संध्याकाळी ठीक ७ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
स्व. पं. वसंतराव चांदोरकर हे अभिजात संगीतात बखले घराण्याचे प्रतिनिधित्व करीत होते. देवगंधर्व भास्करबुवा बखले हे शिल्पा व सावनी चे पणजोबा. त्यांनी गायलेले राग, संगीतबद्ध केलेली नाट्यपदे, अभंग, भक्तिगीते, भावगीते, गवळणी पासून ते लावणीपर्यंतचा वारसा, किंवा विरासतचा कॅनव्हॉस उलगडून दाखविणार आहेत पुण्याच्या या दोन प्रतिभा संपन्न भगिनी शिल्पा पुणतांबेकर व सावनी दातार कुलकर्णी.

त्यांना साथसंगत करणार आहेत तबला- समीर पुणतांबेकर, संवादिनी- अमेय बिच्चू, पखवाज- डॉ. राजेंद्र दूरकर.
या कार्यक्रमास अनुभूती स्कूल च्या संचालिका निशा जैन व उमवी चे कॉमर्स व मॅनेजमेंट विभागाचे डीन डॉ.अनिल डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
चुकवू नये अश्या या मैफिलीचे आयोजन प्रतिष्ठानाने केले असून रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशन ने केले आहे.
