कजगाव दि.९ (प्रतिनिधी) –दिपक अमृतकर | भडगाव तालुक्यातील बाजारपेठेचे गाव म्हणून कजगाव प्रसिद्ध आहे. गाव हे व्यापारी पेठ असल्याने गावात राष्ट्रीयकृत बँकेची शाखा आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेची एकच शाखा कजगाव येथे आहे. परिसरातील तसेच गावातील व्यापारी नागरिकांचे खाते हे या शाखेत आहेत. एकच राष्ट्रीयकृत बँक असल्याने बँकेत नेहमी खातेधारकांची वर्दळ असते. बँकेत व्यवहारचा भरणा हा मोठ्या प्रमाणावर होत असतो. यात कधीकधी ग्राहकाचा भरणा करताना नकळत जास्तीचे पैसे येत असतात. असाच प्रकार हा आज कजगाव शाखेत घडला.
नेहमीप्रमाणे कजगाव येथील व्यापारी संजय येवले हे आपल्या खात्यात भरणा करण्याकरीता शाखेत आले. त्यांनी आपल्याजवळील रक्कम बँकेचे रोखपाल मनोज सूर्यवंशी यांच्याकडे दिली. पैशे मोजतेवेळी भरणा स्लिपवर लिहिलेल्या रक्कमेपेक्षा १७,५०० रुपये कॅश जास्त असल्याचे सूर्यवंशी यांच्या लक्षात आले. त्यांनी लागलीच खातेधारक संजय येवले यांना बोलवुन रक्कम जास्त असल्याचे निदर्शनास आणून दिले व सर्वांसमक्ष ती रक्कम त्यांना परत केली.
संजय येवले यांनी रोखपाल मनोज सूर्यवंशी यांच्या कर्तव्यदक्ष व प्रामाणिकपणाचे आभार मानले आहे. यावेळी शाखाधिकारी श्रीहरी राठोड, अबिनाश कुमार, प्रवीण महाजन हे उपस्थित होते. तसेच शाखेतील खातेधारक आणि कजगाव परिसरातील ग्रामस्थांकडून बँक कर्मचाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होतांना दिसत आहे.
