Home » राजकीय » ठाणे लोकसभा महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ठाणे लोकसभा महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ठाणे | दि.३ ( वास्तव पोस्ट न्यूज )– लोकसभा मतदारसंघाचे महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यापूर्वी ठाणे शहरात महायुतीच्या वतीने विराट रॅली काढून महायुतीचे शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित ठाणेकर नागरिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,

यंदाची निवडणूक ही विकासाची निवडणूक असून देशाला खरोखरच पुढे घेऊन जायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करावे लागतील. पंतप्रधान मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणली आहे. देशाच्या जीडीपी मध्ये सर्वाधिक भर घालणारे आपले राज्य आहे. पाच ट्रीलियनची अर्थव्यवस्था करायची असेल तर त्यासाठी एमएमआर रिजनचा त्यात मोठा वाटा असणार आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी या जागेवर महायुतीचेच उमेदवार जिंकायला हवेत. त्यासाठी एकदिलाने कामाला लागा आणि म्हस्के यांना बहुमताने विजयी करा. नरेश म्हस्के यांना दिले जाणारे मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळणारे मत आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते व आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, माजी आमदार रवींद्र फाटक, मनसे नेते अभिजित पानसे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!