Home » राजकीय » वैशालीताई सुर्यवंशी यांच्या पुढाकाराने पाचोरा येथे मविआचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार

वैशालीताई सुर्यवंशी यांच्या पुढाकाराने पाचोरा येथे मविआचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार

पाचोरा-भडगाव मधून करण पाटील यांना मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार

पाचोरा | दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज )-आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांना पाचोरा-भडगाव मतदारसंघातून वाढीव मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार आज मविआच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात करण्यात आला. शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या पुढाकाराने आयोजीत या मेळाव्यात उदंड प्रतिसाद लाभला. पाचोरा शहरातील स्वामी लॉन्स येथे आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यकर्ता संवाद मेळाव्याच्या प्रारंभी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या वतीने जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्याहस्ते मशाल प्रज्वलीत करून मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी म्हणाल्या की, आपल्याला लोकसभेत महाविकास आघाडीचा उमेदवार पाठवायचा आहे. यासाठी निव्वळ गप्पा करून चालणार नाही. तर यासाठी आपल्याला वाडी – वस्त्यांपर्यंत आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहचावे लागेल. आपल्याला आपले गाव, आपला वॉर्ड आणि आपली गल्ली सांभाळावी लागेल. सर्वात महत्वाचे म्हणजे आपली निशाणी मशाल ही सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. तर, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे पाचोरा-भडगावमधून उन्मेषदादा पाटील यांना सर्वाधीक मताधिक्य होते, अगदी त्याच प्रकारे या निवडणुकीत करण पाटील यांनादेखील विक्रमी मताधिक्य मिळणार असल्याचा आशावाद वैशालीताई सुर्यवंशी यांनी व्यक्त केला. याप्रसंगी त्यांनी सत्ताधार्‍यांवर जोरदार टिका करत देशात, राज्यात आणि पाचोर्‍यातही द्वेषाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप केला. त्यांनी प्रवाहाच्या विरूध्द दिशेने जाण्याचे धाडस केल्याबद्दल उन्मेषदादा पाटील व करण पाटील यांचे तोंड भरून कौतुक केले. तर महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोशल मिडियात सक्रीय राहण्याचे आवाहन देखील केले.

जळगाव लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील म्हणाले की, उन्मेषदादा पाटील यांचे कार्य अतिशय चांगले असतांना देखील त्यांचे तिकिट नाकारण्यात आल्याची बाब दुर्दैवी आहे. तर गेल्या वेळेस नाकारलेल्यांना उमेदवारी का दिली ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. भाजपकडे मोदी यांच्या चेहर्‍याच्या पलीकडे काहीही नाही. तथापि, त्यांची बूथ व्यवस्था मजबूत असल्याने महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी याकडे लक्ष देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. याप्रसंगी महाविकास आघाडीच्या विविध मान्यवरांनी आपापल्या मनोगातून सत्ताधार्‍यांवर जोरदार टिकास्त्र सोडत करण पवार यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी भारतीय जनता पक्ष हा मराठा, बहुजन आणि अल्पसंख्यांक समुदायांमध्ये तेढ निर्माण करत असून सर्वांनी हा प्रयत्न हाणून पाडण्याचे आवाहन केले. तसेच, करण बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून आपण जळगाव लोकसभा मतदारसंघात तगडे आव्हान उभे केले असून त्यांच्या विजयासाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करण्याचे आवाहन देखील संजय सावंत यांनी याप्रसंगी केले.

व्यासपीठावर पक्षाचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्यासोबत पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, ज्येष्ठ नेत्या वैशालीताई सुर्यवंशी, डॉ. अस्मिता पाटील, स्टार प्रचारक प्रियंका जोशी, जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, मा. जिल्हाप्रमुख राजेंद्र गरबड पाटील, योजना पाटील, मा. उपजिल्हा प्रमुख गणेश राजपूत, उपजिल्हाप्रमुख उध्दव मराठे, अरूण पाटील, रमेश बाफना, शरद पाटील, ॲड. अभय पाटील, ॲड. दीपक पाटील, अनिल सावंत, राजेंद्र राणा, दादाभाऊ चौधरी, नंदू चौधरी, राजू काळे, पप्पू राजपूत, धर्मराज राजपूत, विनोद बाविस्कर, ज्ञानेश्‍वर पाटील, देविदास पाटील, खंडू सोनवणे, संतोष पाटील, विकास वाघ, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नितीन तावडे, विकास पाटील, खलील देशमुख, रणजीत पाटील, हर्षल पाटील, अजहरभाई, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अविनाश भालेराव, आम आदमी पक्षाचे योगेश हिवरकर, भडगाव येथील डॉ. अमृत पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमाला पाचोरा-भडगाव मतदारसंघातून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, आम आदमी पक्ष या पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!