नवी दिल्ली | दि. ८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मुंबई पोलीस दलातील माजी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. लखनभैय्या एन्काऊंटर प्रकरणात माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केली आहे. फेक एन्काउंटर प्रकरणात मुंबई पोलिसांकडे आत्मसमपर्ण करण्यासाठी मुदतवाढही मिळाली आहे. गेल्या महिन्यात उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
दरम्यान या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने प्रदीप शर्मा यांना मुंबई पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत वाढवून दिली आहे. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणात राज्य सरकारने आपली भूमिका मांडण्याचे आदेशही दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत प्रदीप शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सत्र न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना निर्दोष ठरवलं होतं. मात्र मुंबई हायकोर्टाने हा निकाल फिरवला होता व प्रदीप शर्मा यांना दोषी ठरवून जन्मठेप सुनावली होती.
प्रदीप शर्मा यांच्यावर कुख्यात गुंड रामनारायण गुप्ता ऊर्फ लखन भैय्या याचा बनावट एन्काउंटर केल्याचा आरोप आहे. २००६ मध्ये ही बनावट चकमक झाली होती. रामनारायण गुप्ता विरोधात गँगस्टर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होता. छोटा राजन टोळीचा संशयित सदस्य म्हणून मुंबई पोलिसांनी ११ नोव्हेंबर २००६ रोजी त्याला अटक करण्यात आली होती. व आणि त्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास त्याला गोळ्या घालून ठार केले होते.
